कचरा प्रकल्प Pudhari
पुणे

Pune : कचरा प्रकल्पांच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त ; केशवनगर येथे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

नितीन वाबळे

केशवनगर परिसरातील सर्वे नं. 9 ते 13 मध्ये गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी 100 टन क्षमतेचा सुप्रा आणि 50 टन क्षमतेचा साईराम, असे दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून या प्रकल्पांमधून दुर्गंधी येत असल्याने परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. नागरी वस्तीजवळ असलेले कचरा प्रकल्प येथून तातडीने हटवावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

सध्या हे दोन्ही कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून या ठिकाणी दररोज सुका कचरा आणण्यात येतो. त्यावर दररोज प्रक्रिया केली जाते, असे महापालिकेकडून सांगितले जात आहे. मात्र, सुका कचरा असूनही या प्रकल्पातील कचर्‍याची दुर्गंधी आजूबाजूला एक-दोन किलोमीटर दूरपर्यंत कशी येते, असा सवाल परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या भागात नागरी वस्ती वाढू लागली असून, कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मुख्य रस्त्याच्या कडेचा कचरा केशवनगर येथील रेणुकामाता चौकातून हे दोन्ही कचरा प्रकल्प दोन किलोमीटर अंतरावर आहेत. या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिक-ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचलेले दिसून येतात. नागरिक जाता-येता येथे कचरा टाकतात. मात्र, महापालिकेकडून तो नियमित उचलला जात नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
कमलेश शेवते, उपअभियंता, घनकचरा विभाग, महापालिका

रहिवाशांकडून आंदोलनाचा इशारा

केशवनगर येथील रेणुकामाता चौक ते कल्याणी बंगला या मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला मागील तीन-चार वर्षांत मोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. या ठिकाणी हजारो कुटुंबे राहवयास आहेत. मात्र, कचरा प्रकल्पांच्या दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने हे प्रकल्प तातडीने दुसरीकडे स्थलांतरित करावेत; अन्यथा आंदोलन केले जाईल, असे येथील पूर्वा सिल्वरसँड्स, मंत्रा इन्सिग्निया, फ्लोरिडी रिव्हरबँक, शुभ स्काय पॉइंट, शुभ इव्हान, फ्लोरिडा रिव्हर वॉक, गोदरेज इन्फिनिटी व गेरा मिस्ट्री वॉटर्स या सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT