पुणे : टीम पुढारी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुण्यात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या बंदला उपनगरांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिक स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी झाले. व्यावसायिकांनी सकाळपासून दुकाने, व्यवहार स्वत:हून बंद ठेवल्याने बाजरात शुकशुकाट दिसून आला. नागरिक व वाहनांअभावी रस्तेही ओस पडल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, दुपारी तीननंतर उपनगरांतील व्यवहार पूर्ववत झाले.
महाविकास आघाडीसह विविध पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या मफपुणे बंदफफ ला खडकवासला नांदेड किरकटवाडी धायरी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीपाला , किराणा दुकान हाँटेल, आदी व्यावसायिकांनी सकाळ पासून दुपारी तीन पर्यंत बंद ठेवली होती. मेडिकल, दवाखाने,बस अशा अत्यावश्यक सेवा सुरु होत्या.
डोणजे, खानापूर, गोर्हे आदी ग्रामीण भागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. किरकटवाडीचा अपवाद वगळता कोठेही निषेध मोर्चा निघाला नाही. बंद चे आवाहन करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले नाहीत. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या देखरेखीखाली खडकवासला धरण तसेच मुख्य रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलिस जवान तैनात होते. दररोज सकाळ पासून पर्यटकांनी गजबजून जाणार्या धरण चौपाटीवरही शुकशुकाट होता खाद्यपदार्थ विक्रेत्याने स्टॉल बंद ठेवले होते. किरकटवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांनी गावात मुक मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या अपमानाचा निषेध केला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, राष्ट्रसेवा समुहाचे अध्यक्ष राहुल पोकळे , माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती पोकळे, राजेश्वरी पाटील आदींसह महाविकास आघाडी विविध संघटनांनी बंद ला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.
विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या पुणे बंदला कात्रज, येवलेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी परिसरातील नागरिक व व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कात्रज परिसरतील दत्तनगर, सुखसागरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, शत्रुंजय मंदिर ते गंगाधाम रस्ता आदी परिसरातील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. मेडिकल, दूध डेअरी, रुग्णालये, भाजीपाला आणि काही ठिकाणी चहाच्या टपरी वगळता नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. थोड्याफार प्रमाणात कात्रज चौक वगळता बाजारपेठा थंडावल्याचे चित्र पाहायला मिळाले. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतल्याचे दिसून आले.
पौडरोड परिसरातील नागरिक आक्रमक
राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पुकारलेल्या पुणे बंदला पौडरोड परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवल्याने या भागात शुकशुकाट दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्याबद्दल राज्यपाल आणि भाजपनेते त्रिवेदी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, याबद्दल नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी नाराजी व्यक्त केली. विविध राजकीय पक्षांनी पुणे बंदची हाक दिल्याने आत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद होती. शाळा, रुग्णालय, औषधांची दुकाने आणि भाजीविक्रेत्यांची दुकाने या वेळी सुरू असल्याचे दिसून आले. शिवप्रेमींसहित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संभाजी बि—गेड आणि इतर काही संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिका व व्यावसायिकांना केले.
वारजे परिसरात निषेध मोर्चा
वारजे, रामनगर, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने परिसरात शुकशुकाट होता. नागरिकांचा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वारजे माळवाडी भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (सेक्युलर), आम आदमी पार्टी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), वारसा फाउंडेशन, मातृभूमी सोशल फाउंडेशन, संभाजी बि—गेड, सोशल मीडिया फाउंडेशन यांच्या वतीने गणपती माथा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्या कारणार्यांविरोधात घोषणा देण्यात आला.
गणपतीमाथा येथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून निघालेल्या मोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकास पुष्पहार घालून करण्यात आला. माजी नगरसेवक दिलीप बराटे, माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक प्रदिप धुमाळ, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, प्राची दुधाने, श्रीकृष्ण बराटे, मयुरेश वांजळे, यशवंत ठोकळ, वसंत कोळी, पैगंबर शेख, निलेश वांजळे, अनिल गायकवाड, भावना पाटील, आलम पठाण, राकेश सावंत, निलेश आगळे, अश्विन ढगे, चंद्रकांत कांबळे, अरविंद शिंदे, अंकुश सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते.