धायरी: नर्हे येथे गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाल्या नसल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. पाण्यासाठी रहिवाशांना वणवण फिरावे लागत असून, याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नर्हे परिसरातील पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून जलवाहिनी फुटली, वीजपुरवठा बंद, मोटार जळाली आदी उडवाउडवीची अधिकार्यांकडून दिली जात असल्याचे नागरिकारंनी सांगितले.
नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना पाणी कधी येणार याची विचारणा केली असता लवकरच पाणी येईल, असे सांगितले जात आहे. परंतु गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. परिसरात महापालिकेच्या वतीने दिवसाआड अर्धा ते पाऊण तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
दररोज उठून सकाळी पाण्यासाठी खासगी टँकरची वाट पाहात बसावी लागत आहे. सकाळी मुलांना शाळेत जाण्यासाठी आवरून द्यायचे, स्वयंपाक करायचा की, पाण्यासाठी वणवण कराची, अशी अवस्था परिसरातील महिलांची झाली असल्याचे शारदा पाटील यांनी सांगितले. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मीटिंगमध्ये असून नंतर फोन करतो, असे सांगितले.