पुणे

पुणे : खराडीचे मैदान पै. सिकंदरने मारले

अमृता चौगुले

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : खराडी येथील काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती आखाडा पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी पै. सिकंदर शेख (महाराष्ट्र) विरुद्ध महान भारत केसरी पै. बिनिया (जम्मू) यांच्यामध्ये झाली. त्यात पै. सिकंदर एकचाक डावावर विजयी झाला. कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर विरुद्ध महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात झाली. यामध्ये पै. हर्षद जखमी झाल्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सुटली. तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध महान भारत केसरी पै. विशाल यांच्यात झाली. त्यात पै. महेंद्र घिस्सा डावावर विजयी झाला. चतुर्थ क्रमांकाची कुस्ती उत्तर प्रदेश केसरी पै. आर्यन प्रताप विरुद्ध नॅशनल चॅम्पियन पै. माऊली कोकाटे यांच्यामध्ये झाली. त्यात पै. माऊली स्वारी डावावर विजयी झाला. सातव्या क्रमांकाची कुस्ती पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध अक्षय मंगवडे यांच्यात झाली. त्यात पै. पृथ्वीराज दुहेरी पटावरविजयी झाला.

आखाडाप्रमुख महादेव पठारे पाटील, महादेव पाटील, बबन पठारे, विलास कंडरे, अध्यक्ष राहुल पठारे, बापू पठारे, दिलीप पाटील, बाळासाहेब राजगुरू, राजेंद्र पठारे, बाळासाहेब पठारे, महेंद्र पठारे, नवनाथ पठारे, शरद पठारे, संजय पठारे यांनी कुस्त्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

दरम्यान, श्री काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अभिषेक, काठी व पालखीची मिरवणूक, भजन स्पर्धा आणि रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांसाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ग्रामस्थांच्या वतीने 30 लाखांचे इनाम..

या आखाड्यात ग्रामस्थांच्या वतीने एकूण 30 लाख रुपयांचा इनाम ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, आशियाई राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेते, अर्जुन वीर पुरस्कार विजेत्यांना या वेळी युवानेते सुरेंद्र पठारे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब पठारे यांच्या वतीने रोख रक्कम इनाम देऊन गौरविण्यात आले. पैलवानांची भोजनव्यवस्था अण्णासाहेब पठारे व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या वतीने करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT