पुणे

PIFF : पिफमध्ये ‘सिटीझन सेंट’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बाविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये 'सिटीझन सेंट' या टिनाटीन कजरिशविली यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला राज्य सरकारचा यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा जयंत दिगंबर सोमळकर दिग्दर्शित 'स्थळ' या मराठी चित्रपटानेही महोत्सवात मोहोर उमटवली असून, या चित्रपटाने राज्य सरकारचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार मिळवला आहे.

राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप गुरुवारी झाला. यानिमित्ताने विविध विभागातील पुरस्कार देण्यात आले. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, नॉर्थ अमेरिका मराठी असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित घोलप, पुणे फिल्म फाउंडेशनचे रवी गुप्ता, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, एमआयटी – एडीटी विद्यापीठाचे प्र – कुलगुरू मोहित दुबे यांच्यासह आंतरराष्ट्रीय ज्युरी, चित्रपट निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

जॉर्जिया या देशातील चित्रपट 'सिटीझन सेंट' ला राज्य सरकारचा 10 लाख रुपयांचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे, दिग्दर्शक कजरिशविली आणि निर्माते लाशा खलवशी यांना प्रत्येकी 5 लाख रुपये विभागून मिळणार आहेत. मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत 'स्थळ' या चित्रपटाला राज्य सरकारचा 5 लाख रुपयांचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पोलिश चित्रपट निर्मात्या मारीया प्रोचाझस्का यांनी दिलेल्या निधीतून खास पारितोषिक एफटीआयआयची विद्यार्थिनी आयेशा जैन हिला देण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या सहकार्याने अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन होजे येथील कॅलिफोर्निया चित्रपटगृहात 27 आणि 28 जुलै या दोन दिवशी अमेरिकेतील पहिला मराठी चित्रपट महोत्सव 'नाफा' आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा अभिजित घोलप आणि डॉ. जब्बार पटेल यांनी केली. सुव—त जोशी आणि सखी गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

पिफमध्ये जाहीर झालेले आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

  •  प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक – अ‍ॅनेस टेलेन्ने – द ड्रीमर.
  •  मराठी चित्रपट पुरस्कार : चित्रपट महामंडळाचे पुरस्कार
  •  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – श्रीकांत प्रभाकर – भेरा
  •  उत्कृष्ट अभिनेत्री-स्वाती गोतावळे -छबीला
  •  उत्कृष्ट अभिनेता – देवा गाडेकर – वल्ली
  •  उत्कृष्ट सिनेमाटोग्राफर – विजय मिश्रा – श्यामची आई
  •  उत्कृष्ट पटकथा पुरस्कार – जयंत दिगंबर सोमळकर – स्थळ
  •  स्पेशल मेंशन ज्युरी अवार्ड फॉर आर्ट डायरेक्टर – श्रीकांत प्रभाकर – भेरा
  •  स्पेशल मेंशन सर्टिफिकेट – कबीर – जिप्सी
SCROLL FOR NEXT