पुणे

आयटीयन्सला खड्ड्यांतून काढावी लागतेय वाट, हिंजवडी आयटीनगरीतील रस्त्यांची दुरवस्था

अमृता चौगुले

हिंजवडी : आयटीनगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीमध्ये पीएमआरडीए व एमआयडीसी प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक, आयटीयन्स व विद्यार्थ्यांना खड्डेमय रस्त्यातून वाट काढावी लागत आहे.

पाइपलाइनसाठी रस्त्याचे खोदकाम

हिंजवडी परिसरात विविध कामांसाठी फेज एकमधील रस्ते जागोजागी खोदल्याने हिंजवडीकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. नावाला आयटी मात्र प्रत्यक्षात जणू खेड्यात आल्याचा भास या रस्त्याने ये-जा करताना होत आहे. या परिसरातील रस्ते एमआयडीसीच्या अखत्यारीत असून, मेट्रोसाठी भूमिगत हाय टेन्शन वीज वाहिन्या टाकण्यासाठी पीएमआरडीएकडून जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. तर, विविध खासगी इंटरनेट कंपन्यांनी तसेच एमएनजीएल गॅस पाइपलाइनसाठीदेखील मनमानी पद्धतीने रस्ते खोदला होता.

एमआयडीसी, पीएमआरडीएची दुरुस्तीकडे दुर्लक्ष

या रस्त्याची डागडुगी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यांची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. बहुतेक ठिकाणी कामे संथ गतीने सुरू आहेत. याबाबत एमआयडीसी व पीएमआरडीए एकमेकांकडे बोट दाखवून चालढकल करत असल्याचे दिसत आहे.

खड्ड्यात पाणीच पाणी

हिंजवडीच्या मुख्य शिवाजी चौकात दररोज लाखो वाहने, आयटीयन्स, नागरिक ये-जा करतात. येथे बस स्टॉपदेखील आहे. मात्र, चारही बाजूंना खड्डेच खड्डे आहेत. रस्ता धूळ अन खडीने माखला आहे. त्यामुळे असुविधेचा सामना करावा लागत आहे.

पीएमआरडीएचे सुमारे 90 टक्के काम झाले आहे. काही ठिकाणी जंक्शन बॉक्स करण्यात येत आहेत. काम जलद करावे यासाठी सूचना केल्या आहेत. ज्या-ज्या ठिकाणी खोदले आहे, त्याठिकाणी मुरुम टाकण्यात येईल. आता डांबर प्लांट बंद असल्याने रि-सर्फेशिंग करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
– संजय थोरात, उपअभियंता एमआयडीसी

आयटी पार्कमधील केबल टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. केवळ काही कनेक्शन आणि टेस्टिंग बाकी आहेत. आयटी परिसरात मोठा इंडस्ट्रीयल परिसर असल्याने कोणालाही व्यत्यय न येऊ देता हे काम करावे लागते. मात्र, रस्त्यांच्या रि-सर्फेशिंगसाठी एमआयडीसीला सूचना देऊन रहिवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
– विवेक खरवडकर, नगर रचनाकार पीएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT