पुणे

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि. 6) व मंगळवारी (दि. 7) असे दोनच दिवस शिल्लक आहेत. अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक व पोलिस यंत्रणा संतर्क झाली आहे. असे असताना रविवारी (दि. 5) रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. पोटनिवडणुकीसाठी अर्ज वाटप व दाखल करण्यास 31 जानेवारीला सुरूवात झाली आहे.

आतापर्यंत तब्बल 111 जणांनी एकूण 199 अर्ज नेले आहेत. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, एमआयएम आणि अपक्षांचा समावेश आहे. तर, 4 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दोन दिवसांत मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक व पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, तशी दक्षता घेण्यात आली आहे. थेरगाव 'ग' क्षेत्रीय कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

उमेदवारांसोबत केवळ पाच जणांना प्रवेश
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह केवळ 5 जणांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवाराच्या फक्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेने परिसराची रविवार (दि. 5) पाहणी केली. खुल्या गटातील उमेदवारास 10 हजार आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला 5 हजार रुपयांची रक्कम रोखीने जमा करावी लागेल. तसेच, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, राज ठाकरे यांची बिनविरोधसाठी विरोधकांना विनंती
दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (दि. 5) विरोधातील प्रमुख नेत्यांना केली. त्याला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल. त्यामुळे शहरात विरोधकांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

SCROLL FOR NEXT