पुणे; पुढारी वृत्तसेवा : वस्तीतल्या जगण्यामुळे कुठेतरी देहविक्रय करणार्या महिलांच्या मुलांची शिक्षणाशी नाळच जुळली नव्हती. पण, मुलांमध्ये शिक्षणाचे स्वप्न मात्र कायमच होते. त्यांच्या याच स्वप्नाला पंख देण्याचे काम वंचित विकास संस्थेच्या 'फुलवा' प्रकल्पातून झाले अन् आज देहविक्रय करणार्या महिलांची मुले शिकू लागली आहेत, शाळेत जाऊ लागली आहेत. प्रकल्पांतर्गत झालेल्या जनजागृतीमुळे, प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून, ही मुले सहकारनगर आणि बुधवार पेठेतील दोन शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच, प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणार्या घरकुलातही देहविक्रय करणार्या महिलांच्या मुलांचा सांभाळ केला जात असून, तिथेही बालवाडी चालवून मुलांना शिक्षण दिले जात आहे. मुलांमध्ये आता शिक्षणाचे अंकुर रुजले आहे.
वंचित विकास संस्थेतर्फे 2005 सालापासून 'फुलवा' प्रकल्प बुधवार पेठेतील वस्तीत देहविक्रय करणार्या महिलांच्या मुलांसाठी राबविला जात आहे. प्रकल्पांतर्गत चार महिने ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी घरकुल वस्तीत चालविले जात आहे. येथे मुलांचा दिवसभर सांभाळ करण्यासह मुलांना शिक्षणासाठी, कला शिक्षणाशी जोडले जात आहे. वस्तीतले जगणे मुलांच्या नशिबात येऊ नये, त्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळावी, यासाठी संस्थेतील प्रतिनिधी प्रयत्न करीत असून, त्याचाच एक भाग म्हणजे वस्तीतून रोज घरकुलात 40 मुले येत आहेत. त्यातील 18 मुले शिक्षणासाठी शाळेत जात आहेत.
या मुलांना संस्थेतील महिला प्रतिनिधी सकाळी शाळेत सोडतात आणि सायंकाळी शाळेतून घेऊन येतात. त्यामुळे मुलांचे शालेय शिक्षण अविरतपणे सुरू असून, मुलांच्या शाळेतील अभ्यासाकडे आणि एकूण शैक्षणिक वर्षाकडेही लक्ष दिले जात आहे. जी मुले शाळेत जातात, त्यांच्याकडे त्यांना शिक्षणाशी जोडण्यात आले आहेच. पण, चालविल्या जाणार्या घरकुलात येणार्या मुलांसाठी बालवाडीही चालविली जात आहे. या मुलांना शालेय शिक्षणासह विविध कलांचे शिक्षणही दिले जात असून, मुलांच्या आईसुद्धा मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करीत आहेत.
वंचित विकास संस्थेच्या देवयानी गोगले म्हणाल्या की, आता मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्या आईसुद्धा जागरूक झाल्या असून, मुलांनी शिकले पाहिजे, असे त्यांना वाटते. त्यामुळे आता त्यांना त्या शाळेतही पाठवत आहेत. दिवसभर मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना कलाशिक्षण देण्यावरही आम्ही भर देतो. त्यांना नृत्य, गाणी, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे, बागकाम असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचे शिक्षण पुढेही चालू राहावे म्हणून आम्ही त्यांची वसतिगृहात राहण्याची सोयही करतो.
मी डॉक्टर होणार..!
शाळेत जाऊन खूप छान वाटते. मला शिकायचे होते आणि ते स्वप्न साकार होत आहे. मला विज्ञान हा विषय आवडतो. पुढे जाऊन मी डॉक्टर होणार आहे, असे मनोज (नाव बदलले आहे) याने सांगितले आहे.