पुणे

पुणे : मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीऐवजी दिल्लीला जायला हवे : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'राज्यात शिंदे सरकार कसे सत्तेवर आले आहे, हे लहान मुलांनाही माहिती आहे. नागरिक बैलपोळ्यानिमित्त बैलाच्या अंगावर '50 खोके, एकदम ओके' लिहित आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्याची अवहेलना करीत आहेत. ते दिल्लीत जाऊन मंत्र्यांना भेटत आहेत. मात्र, आपले मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते त्यावर एक शब्द बोलत नाहीत. खरेतर त्यांनी गुवाहाटीला जाण्यापेक्षा दिल्लीला जायला हवे होते,' अशी टीका माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात थोरात बोलत होते. काँग्रेस भवन येथे शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री रमेश बागवे, सप्ताहाचे आयोजक प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, दत्ता बहिरट, रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, मनीष आनंद आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 'यूपीए' सरकारने सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना दिली. माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना, रोजगार हमी योजना, असे लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. 'भारत जोडो'मुळे देशातील वातावरण बदलत आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, तरुणांसाठी राज्यघटनेच्या मूल्यांवर, तत्त्वांवर शिबिरे घेऊन जागृती करायला हवी.

गुजरातकडून भाजपचा पराभव
देशापुढील व समाजापुढील मूलभूत प्रश्नांवर पंतप्रधान व भाजप नेते शब्द काढत नाहीत. त्यामुळे आपणास परिवर्तनाची तयारी ठेवली पाहिजे. गुजरातमधील विजय कोणाचा आहे? 'आप'ने कुणाची मते घेतली? हे लक्षात घेतले; तर खर्‍या अर्थाने भाजपचा परभव झाल्याचे समोर येते. गुजरातसोडून इतर ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे.

भाजप नेत्यांचे भान गेले आहे : थोरात
'भाजप नेत्यांचे भान गेले आहे. त्यामुळे बेताल आणि बेभान वागणार्‍या भाजपचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आला आहे,' अशी टीका राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पुणे काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, 'कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी शिक्षण संस्थांसाठी मदत मागितली असेल, त्याला कोणी भीक म्हणते का? महापुरुषांवर आघात करणार्‍या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.' कर्नाटक व सीमाप्रश्नावर थोरात म्हणाले, 'सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे.

न्यायालयात आपली बाजू भक्कम मांडली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, त्यावर काहीच कृती केली जात नाही.' पुणे शहर काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित नसतात, त्यांना कार्यक्रमाची माहिती नसते, पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे का, या प्रश्नावर थोरात म्हणाले, 'पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. पक्ष एकसंघ आहे. व्यक्तिगत कामामुळे पक्षाचे शहराध्यक्ष शिंदे कार्यक्रमास उपस्थित राहू शकलेले नाहीत.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT