पुणे

पुणे : मुख्यमंत्र्यांचा झंझावात अन् ढोल-ताशांचा दणदणाट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पुणे शहरात गणेश दर्शनाचा झंझावती दौरा केला. एकाच दिवसात तब्बल दहा गणेश मंडळांत जाऊन आरती केली. साक्षात मुख्यमंत्री येणार असल्याने सर्वच मंडळांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. ढोल-ताशांच्या दणदणाटात त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत झाले. गल्लीबोळातून पायी जाताना त्यांनी अनेक नागरिकांना हस्तांदोलन केले. अनेकांनी सेल्फी विथ मुख्यमंत्रीचा आनंद लुटला. या प्रकाराने सुरक्षारक्षकांची मात्र प्रचंड तारांबळ उडाली. अडीच ते तीन तासांत त्यांनी शहरातील कार्यक्रम आटोपून सिंहगडाजवळील डोणजे गावी चित्रपट अभिनेते नाना पाटेकरांच्या घरी प्रस्थान केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज आगळेवेगळे रूप पुणेकरांनी अनुभवले. त्यांनी शहरातील तब्बल दहा गणेश मंडळांत जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. आरती करीत प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी, कार्यकर्ते यांची चौकशी केली. शाल, श्रीफळ, हार आणि प्रचंड संख्येने आलेले पुष्पगुच्छ पाहून मुख्यमंत्री पुणेकरांच्या स्वागताने भारावून गेले होते. सकाळी 11 पासून त्यांचे कार्यक्रम नियोजित होते, मात्र ते प्रत्यक्षात दीड वाजेच्या सुमारास शहरात आले. त्यामुळे सकाळपासून गणेश मंडळांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

दुपारी 1.30 वाजता ते प्रथम कसबा गणपतीला आले. तेथे प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत झाले. त्यांनी गणपतीची आरती केली. त्यानंतर त्वष्टा कासार गणेश मंडळ, बुधवार पेठेतील तरुण अशोक गणेश मंडळ, दगडूशेठ गणेश गणपतीची आरती त्यांनी केली. तेथेही प्रचंड गर्दी झाली होती. तेथून ते अखिल मंडई गणेश मंडळ, तुळशीबाग गणेश मंडळाची आरती करून लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यातील गणपतीची आरती केली. तेथून यशवंतनगर गणेश मंडळ, नवी पेठ, साई गणेश मंडळ कोथरूड या ठिकाणी गेले. त्यानंतर शेवटी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या डोणजे गावातील घरी आरतीसाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास रवाना झाले.

मंडई परिसरात गर्दी…
दुपारी सव्वादोनच्या सुमारास मुख्यमंत्री अखिल मंडई मंडळाच्या ठिकाणी आले. त्यांनी शारदा-गजाननाचे दर्शन घेतले…अवघे काही मिनिटे ते उत्सव मंडपात थांबले. लोकांची गर्दी अन् लोकांचा आवाज ऐकून गाडीतून ते बाहेर आले अन् त्यांनी हात उंचावत लोकांना अभिवादन केले.

'हात दाखवा, मुख्यमंत्री थांबवा…'
पुणेकरांना बुधवारी 'हात, दाखवा मुख्यमंत्री थांबवा,' असे चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान पाहायला मिळाले. शिंदे यांनी पुण्यातील मानाचे आणि प्रमुख गणपती मंडळांना भेटी देऊन आरती केली. त्यानंतर शिंदे हे आपली सुरक्षा बाजूला करीत लोकांमध्ये मिसळत होते. त्यामुळे सुरक्षारक्षकांची धावपळ उडत होती.

हात उंचावून अभिवादन
गणेशभक्तांनी हात दाखवल्यास मुख्यमंत्री लगेच त्याच्या दिशेने जाऊन हस्तांदोलन करीत होते. तसेच एका मंडळापासून दुसर्‍या मंडळापर्यंत जाताना सर्वांना हात उंचावून अभिवादन करीत होते. विशेष म्हणजे नियोजित दौर्‍यात नसलेल्या जिलब्या मारुती गणपती मंडळाला भेट नव्हती, असे असताना शिंदे यांनी ताफा थांबवत भेट दिली. या वेळी सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली होती.

दगडूशेठला पावसातही गर्दी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी गणरायाची आरती केली. आरतीनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. शिंदे म्हणाले, 'या वर्षीचा गणपती जोरदार आहे ना.. निर्बंधमुक्त गणपती उत्सव. मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेत संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, जल्लोषात, धूमधडाक्यात हा उत्सव साजरा करीत आहेत. हे बघून फार आनंद होत असून, समाधान वाटत आहे. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येवो, सुख-समृद्धीचे, भरभराटीचे दिवस येवोत.'

नवी पेठेत महिलांकडून औक्षण…
पेठ येथील यशवंतनगर सोसायटीतील यशवंतनगर गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामध्ये उशीर झाल्याने हा ताफा तब्बल दोन तासांनी म्हणजेच 3 वाजून 10 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचला. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गणरायाची आरती केली. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन ते पुढच्या गणरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले. त्यांच्यासमवेत आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते.

पेंटिंगमुळे मुख्यमंत्र्यांशी ओळख
बुधवार पेठेतील तरुण अशोक मंडळात मुख्यमंत्री आरती करण्यासाठी गेल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. संजय तावरे हे या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत, ते पेंटिंगची कामे करतात, एक वर्षापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पेंटिंग काढले होते, ते पेंटिंग एका मित्राच्या ओळखीने शिंदे यांच्याकडे पोहचविले होते, तेव्हापासून तावरे व शिंदे यांची ओळख आहे. या ओळखीतून शिंदे गणपतीच्या आरतीला आले, असे स्वत: तावरे यांनी सांगितले आहे.

तुळशीबागेत महिलांशी संवाद
शिंदे यांनी दुपारी सव्वादोन वाजता मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळास भेट दिली. या वेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांचा तुळशीबाग गणपतीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. मंडळात महिला दिन म्हणजे एक दिवसाचे व्यवस्थापन महिला करीत असतात. त्या वेळी मुख्यमंत्री यांनी महिलांशी संवाद साधला. तसेच या ठिकाणी गणपती पाहण्यासाठी आलेल्या बालकांशीही हस्तांदोलन केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, गणेश रामलिंग, किरण चौहान, मयूर दिवेकर, अभिजित वाळके उपस्थित होते. त्यानंतर 2 वाजून 22 मिनिटांनी तेथून रवाना झाले.

ताई, काळजी घ्या, अधिवेशनाला या…
ताई, तुम्ही काळजी घ्या, लवकर बरे व्हा आणि पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये यायचं आहे, अशी भावनिक चौकशी मुख्यमंत्री शिंदे यांनी केसरी वाड्यात जाऊन आमदार मुक्ता टिळक यांची केली. त्यांनी विविध मुद्द्यांवर मुक्ता टिळक यांच्याशी चर्चाही केली. जुने वाडे, जुन्या इमारती यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न टिळक यांनी शिंदे यांच्यापुढे मांडला. तसेच, कसबा मतदारसंघातील पार्किंग समस्येचा विषयही मुख्यमंत्र्यांना सांगितला.

भूषण गगराणी यांना केला फोन…
मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाचे सचिव भूषण गगरानी यांना थेट फोन लावला. "हॅलो, मी आता पुण्यात आहे. मुक्ताताई टिळक यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर 40 वर्षांहून जुने वाडे, इमारती आहेत. तसेच तिथे राहणार्‍या नागरिकांचा पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो मार्गी लागला पाहिजे आणि काही तरी मार्ग काढा," अशा सूचनादेखील एकनाथ शिंदे यांनी सचिवांना केल्या.

SCROLL FOR NEXT