पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून असे घडत आहे. निष्ठा यात्रा मारामारी करण्यासाठी काढली आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांच्या 'निष्ठा यात्रा' बद्दल विचारले असता त्यांनी 'भडकाऊ भाषणे करायची आणि हल्ले करायचे' अशा शब्दांत यात्रेवर टीका केली.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, 'कायद्यासमोर कोणीही मोठा नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. जनतेला कोणत्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये.
उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारणा केली असता, 'हा भ्याड हल्ला आहे. हल्ला करून पळून जायचे ही कोणती मर्दुमकी', असा खोचक सवाल त्यांनी केला.' पोलीस योग्य ती कारवाई करतीलच, असेही ते म्हणाले.
शिंदे म्हणाले, 'आमचे सगळे आमदार कायद्याचे, शिस्तीचे पालन करणारे आहेत. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, याची ते काळजी घेतात. आमचे पदाधिकारीही शिस्तीचे पालन करतात. समोरच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने वागता येणार नाही. जनतेला त्रास होईल अशा पद्धतीने वागणे चुकीचे आहे.'
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. खासदार गिरीश बापट, आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा अनिल बाबर यांची विचारपूस करत नातेवाईकांशी संवाद साधला. रात्री पावणेबाराच्या सुमारास ते रुग्णालयात दाखल झाले.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आमदार अनिल बाबर उपस्थित होते. 'दीनानाथ' प्रशासनातर्फे डॉ. माधव भट यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. प्रकाश आमटे यांच्या कुटुंबियांशीही शिंदे यांनी संवाद साधला.