Chief Minister Pune potholes complaint
पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकरांची हाडे खिळखिळी झाली आहेत. तरीही नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्याचे काम महापालिकेकडून नेहमीच होते. आता रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच करावी लागली आहे. सीएमनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे शहरातील खड्ड्यांकडे लक्ष वेधत तातडीने दुरुस्ती करा, अशी सूचना केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे पडणार, हे आता समीकरणच झाले आहे. खड्डे पडू नयेत, यासाठी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण करून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, एक-दोन पावसातच पुणेकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो, हे नेहमीचे चित्र झाले आहे. (Latest Pune News)
त्यातच पडलेले खड्डे बुजविण्याचे काम तातडीने होत नसल्याने दणके सहन करण्यासह वाहतूक कोंडीच्या गंभीर प्रश्नाला नागरिकांना सामोरे जावे लागते. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तर आणखीनच बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना खड्ड्यांची तक्रार करता यावी आणि तातडीने खड्डे बुजविले जावेत, यासाठी यावर्षीपासून ‘रोडमित्र’ ॲप सुरू केले आहे.
या माध्यमातून आत्तापर्यंत शेकडो खड्डे बुजविले गेले असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणची तक्रार आली तेथीलच खड्डे बुजविले जात असून, त्यालगतचे खड्डे तसेच ठेवले जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. त्यामुळे खड्ड्यांतून पुणेकरांची सुटका होत नसल्याची स्थिती कायम आहे. याचा थेट अनुभव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आला आहे.
गत आठवड्यात मुख्यमंत्री हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे याबाबत थेट आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवत रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश दिल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तक्रार केलेला रस्ता हा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, याबाबत नक्की स्पष्टता होऊ शकली नसली तरी पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
‘त्या’ रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातात...
पुणे शहरात व्हीआयपी व्यक्तींचे दौरे सातत्याने सुरू असतात. मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री आदी विविध कार्यक्रमानिमित्त शहरात येत असतात. त्यामुळे संबंधित रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जाते. मुख्यमंत्रीही आठवड्यातून एक ते दोनवेळा पुणे दौऱ्यावर येत असतात. त्या वेळीही खड्डे बुजविणे, अतिक्रमणे काढणे अशी कामे तात्पुरत्या स्वरूपात होतात. मात्र, त्यानंतर ‘पुढे पाठ मागे सपाट’ अशी अवस्था रस्त्यांबाबतही होत असल्याचे चित्र आहे. पुणे कॅन्टोन्मेंटच्या निमित्ताने संपूर्ण पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील लोकप्रतिनिधी उदासीन
पुणे शहरात केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री, विधानपरिषदेच्या उपसभापती, खासदार, आमदार असे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पत्र देण्याच्या पालिकेकडे या सर्व लोकप्रतिनिधींकडून उदासीनता दाखविली जात असल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही परिस्थिती आहे. प्रामुख्याने उपनगरातील आणि समाविष्ट गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे किमान मतदारसंघातील रस्त्यांबाबत तरी हे लोकप्रतिनिधी आक्रमक भूमिका घेतील, अशी अपेक्षा आहे. आता मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांची तक्रार केल्याने प्रशासनाबरोबरच हे लोकप्रतिनिधी जागे होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.