गेल्या दोन महिन्यांपासून हिंदू धर्मात मांसाहार वर्ज्य होता. दसर्यापासून मांसाहारास सुरुवात झाली असल्याने चिकनचे बाजारभाव कडाडले आहेत. 160 रुपये किलो दर असणारे चिकन आता 180 रुपये किलो झाले आहे. हे दर किरकोळ विक्रीसाठी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ब—ॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये अचानकपणे वाढ होऊन तो 100 रुपये झाला आहे. त्यामुळे 180 रुपये किलो दराने चिकन विक्री किरकोळ विक्रेते करत असल्याचे कळंब (ता. आंबेगाव) येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अॅण्ड एग्ज सेंटरचे विक्रेते आणि घोडेगाव येथील भारत चिकनचे होलसेलचे व्यापारी जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील 103 गावांतील जवळपास 500 चिकन व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची चिकन, अंडी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. बकऱ्याचे मटण 700 ते 720 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती कळंब-एकलहरे येथील बकराचे व्यापारी व चॉईस मटणचे विक्रेते शेखर कांबळे तसेच मंचर येथील बाबा मटन शॉपचे विक्रेते मोहम्मद आरीफ इनामदार, शारूफ इनामदार यांनी माहिती दिली.
विजयादशमीच्या सायंकाळच्या सत्रात हॉटेल, ढाब्यांवर नॉनव्हेज खाण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले, अशी माहिती तिरंगा ढाब्याचे नितीन भालेराव, एकलहरे येथील हॉटेल मल्हारचे संतोष डोके, रामचंद्र गाडे, संदेश गाडे, अर्जुन डोके, निलेश डोके यांनी दिली. अंड्याच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची माहिती अंडी उत्पादक शेतकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात आणि निकेतन दैने यांनी दिली. दसर्याच्या अगोदर 500 रुपये शेकडा अंड्यांची विक्री होत होती. दसर्यानंतर अंड्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने शेकडा 560 रुपये शेकडा दराने विक्री होत असल्याचे पोल्ट्री व्यवसायिकांनी सांगितले. चिकनच्या दरात भविष्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता घाऊक बाजारात वर्तविण्यात येत आहे.