बावधन : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील भूगाव, भुकूम येथील छत्रपती शिवाजी महाराज तलाव कचर्याच्या विळख्यात सापडला आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या तलावाच्या परिसरात सध्या कचरा साचला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाला सोबत घेऊन या कचर्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या तलावातून दोन्ही ग्रामपंचायती नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करीत आहेत.
परंतु, तलावाच्या परिसरात सध्या कचरा साचल्याने तलावातील पाणी वापरण्यायोग्यसुद्धा आहे की नाही, असा प्रश्ना उपस्थित केला जात आहे. तलावाच्या भिंतीवर काही लोक कचरा टाकत आहेत. या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तलावाच्या भिंतीवर झाडी वाढली असून, या ठिकाणी प्रेमीयुगुल सायंकाळी येऊन बसतात.
तसेच तळीरामांचा वावर वाढल्याने या भागात दारूच्या बाटल्या ठिकठिकाणी पडलेल्या दिसून येत आहेत. या प्रकारांना आळा घालण्याची मागणीही होत आहे. काही दिवसांपूर्वी भूगाव ग्रामपंचायतीने परिसरात कचरा टाकणार्यांचे व्हिडीओ शूटिंग केले जात होते. या भागात कचारा टाकणार्यांची नावे परिसरातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली जात असत. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण 99 टक्के कमी झाले होते. ही शक्कल पुन्हा राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या तलावाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असून, ते इकडे फिरकत नसल्यामुळे तलावाची ही अवस्था झाल्याचे मत भूगावचे माजी उपसरपंच अक्षय सातपुते यांनी व्यक्त केले. याविषयी पाटबंधारे विभागाचे अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तलाव परिसराची पाहणी करून लवकरच आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.