पुणे

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ‘सर्वोत्कृष्ट’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) सन 2022-23 च्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून कै. वसंतदादा पाटील 'सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार' हा कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 2 लाख 51 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्हीएसआय संस्थेचे उपाध्यक्ष व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी (दि. 5) मांजरी येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते.

व्हीएसआयची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.11) सकाळी साडे दहा वाजता मांजरी येथे होत आहे. त्यावेळी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. नियामक मंडळाचे सदस्य या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री व व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील व अन्य सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. अन्य घोषित करण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे: कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास, कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास, कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार हा दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कारखान्यास, कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार हा कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास, कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार हा सोलापूर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख एक लाख रुपये असे या सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
या शिवाय विभागवार उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन, उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन, तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार, अधिकारी, कर्मचार्‍यांसाठीचे विविध गटातील पुरस्कारचीही घोषणा करण्यात आली.

व्हीएसआयच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही
दरम्यान, व्हीएसआयकडून 1981 पासून विविध प्रकारचे अभ्यासक्रम घेतले जात असून आजवर 9 हजार 620 विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. तर अल्प मुदतीचे 6 हजार 254 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा गुरुवार दि.11 जानेवारी रोजी व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार व उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT