पुणे

छटपूजेला प्रारंभ, तरीही पवना घाट अस्वच्छ

अमृता चौगुले

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : छटपूजेचा उत्सव शनिवारपासून (दि. 29) सुरू होणार आहे. तरीही दापोडी येथील पवना घाटावर खोदकामाचा डोंगर, वाढलेले गवत, अस्वच्छता आदी समस्यांमुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांमध्ये नाराजी
दापोडीतील पवना नदीच्या घाटावर छठ पूजेचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्यामुळे छठ पूजा करता आली नाही. परंतु, यावर्षी सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरही छटपूजा साजरी करण्यासाठी पवना घाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. छठपूजा उत्सव समितीने अनेक वेळा येथील समस्या सोडविण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

खोदकामामुळे घाटावर जाण्यास अडथळा
फुगेवाडी, दापोडी गावठाण, कासारवाडी आदी परिसरातील भाविक छठ पूजेच्या उत्सवासाठी पवना घाटावर येतात. मात्र, घाटावर अस्वच्छता असल्यामुळे छटपूजा कशी साजरी करावी, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. दीड महिन्यांपासून ड्रेनेजलाइन टाकण्याच्या नावाखाली खोदकाम करून ठेवल्यात आले आहे. यामुळे भाविकांना या खोदकामाचा फटका बसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेकेदारांना सांगून सुद्धा या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित प्रशासनाने घाटाची पाहणी करून रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे. घाटाची स्वच्छता करून भाविकांना दिलासा द्यावा.
                                                          – संजय काटे, माजी नगरसेवक

महापालिकेच्या वतीने लाखो रुपयांची कामे सुरू आहेत. मात्र, नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. दीड महिन्यापासून पवना घाटावर खोदकाम करून ठेवले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. छटपूजा कशी साजरी करावी, हाच प्रश्न भाविकांना पडला आहे.
                                                      – ब्रिजेश यादव, अध्यक्ष, उत्सव कमिटी

SCROLL FOR NEXT