पुणे

पुणे : हुरहुर, धडधड अन् जल्लोष…! घोषणांनी दणाणला परिसर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सकाळी आठची वेळ… कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्राच्या बाहेर महाविकास आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यांची हळूहळू गर्दी जमण्यास सुरुवात… पोस्टल मतमोजणी आणि पहिल्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असलेला आनंद … जस जसे निकालाचे कल हातामध्ये येत होते, तसतसे भाजप नेते, कार्यकर्ते केंद्र परिसरातून काढता पाय घेत होते… तर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास केलेली एकच सुरुवात… हाच जल्लोष विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या दमदार एन्ट्रीने शिगेला पोहोचला.

कोरेगाव पार्कमधील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त होता. ओळखपत्र पाहून उमेदवार प्रतिनिधींना सोडले जात होते. कार्यकर्त्यांना ठराविक अंतरावर बॅरिकेड लावून दूर ठेवले होते. ध्वनिक्षेपकाद्वारे मतमोजणीची आकडेवारी सांगितली जात होती. परंतु, त्यापेक्षाही अधिक वेगाने मतमोजणी केंद्रावरील प्रतिनिधींकडून अपडेट कळत असल्याने सातव्या-आठव्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

यामध्ये महिलांचा सहभागदेखील मोठ्या प्रमाणात होता. मतमोजणी केंद्रावरील भाजपच्या नेत्यांमध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी मतमोजणीचा कल पाहून लवकरच मतमोजणी केंद्राचा परिसर सोडला, तर माजी सहभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांसह काही मोजकेच कार्यकर्ते निकाल कळेपर्यंत थांबले. तर, दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आदी नेते केंद्रावर सुरुवातीपासून थांबून उमेदवारासोबत विजयी रॅलीमध्येच सहभागी झाले.

दुपारी बारा वाजण्याच्या अगदी काही मिनिटे अगोदर महाविकास आघाडीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर सव्वाबाराच्या सुमारास धंगेकर मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. कार्यकर्त्यांनी गुलाल, ढोल-ताशाच्या दणक्यात धंगेकरांचे स्वागत केले. खांद्यावर उचलून घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. 'हू ईज धंगेकर, किंग इज धंगेकर, महाविकास आघाडीचा विजय असो, पन्नास खोके एकदम ओक्के', अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

प्रतिभा धंगेकरांचा साधेपणा…
विजय निश्चित झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावर दाखल झालेल्या धंगेकर दाम्पत्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा मोठा गराडा होता. मतमोजणी केंद्रावर जाणार्‍या रस्त्यावर बॅरिकेड असल्याने आत जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या रवींद्र धंगेकरांपासून थोडे बाजूला जाऊन त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर या आत जाण्यास निघाल्या खर्‍या, परंतु त्यांनाही पोलिसांनी हटकले. प्रतिभा धंगेकर यांनी पोलिसांना हसून, 'मी धंगेकरांची पत्नी आहे, प्लीज मला पुढं जाऊ द्या…' असे सांगितले. या त्यांच्या साधेपणाने पोलिस कर्मचार्‍यांनीदेखील कौतुक करून लगेचच त्यांना केंद्राकडे जाण्यास परवानगी दिली.

एकाच काठीला महाविकास आघाडीचा झेंडा
महाविकास आघाडीच्या विजयानंतर एका कार्यकर्त्याने एकाच काठीला प्रमुख पक्षांसह मित्रपक्षांचे झेंडे लावले होते. या कार्यकर्त्याचे सगळे कौतुक करीत होते आणि महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देत होते.

हलगीच्या तालावर थिरकल्या तरुणी…
मतमोजणी केंद्राच्या बाहेर हलगीने सगळ्या कार्यकर्त्यांना ठेका धरण्यास भाग पाडले. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर होत्या त्या तरुणी. केंद्राच्या समोरील बॅरिकेडच्या समोरच तरुणींचा ग्रुप हलगीच्या तालावर थिरकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT