माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग दोनदा तपासली गेल्याने राज्यात वाद उफाळला असताना बुधवारी (दि. 13) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना त्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासण्यात आल्या. फोनवर बोलत असलेले पवार त्या बॅगेत पैसे आहेत का चेक कर, असे पथकातील अधिकार्याला म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्याने उफाळलेला वाद ताजा असतानाच ठाकरे यांच्याबाबत मंगळवारी पुन्हा लातूरमध्येही याची पुनरावृत्ती घडली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील बॅगांची बारामती येथे तपासणी केली आहे. उपमुख्यमंत्री पवार मंगळवारी रात्री बारामतीत दाखल झाले.
बुधवारी सकाळीच त्यांनी तीन गावांचा धावता दौरा केला. त्यानंतर ते राज्यातील पुढील सभांसाठी हेलिकॉप्टरने रवाना होत असताना निवडणूक आयोगाच्या पथकाने त्यांच्या बॅगांची तपासणी केली. अजित पवार यांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. अजित पवारांनी फोनवर बोलत असताना स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. या वेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेतील चकल्या हातात घेऊन खा- खा बाबा...सगळ्या बॅगा तपास...त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर...असं अजित पवार अधिकार्यांना बोलताना दिसले.