लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने एक तरुणीची आठ लाखांची फसवणूक करणार्या दोघांच्या विरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार सुनील भावे (रा. कुसगाव, ता. मावळ, जि . पुणे) आणि रचना सुर्वे ऊर्फ पूर्वा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) असे या आरोपींची नावे आहेत. वर्षा शांतेश्वर कदम (वय 29 वर्ष, सध्या रा. कुरवंडे, ता. मावळ, पुणे, मूळ रा. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. वर्षा कदम या लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या संस्थेचे कॅन्टीन चालवतात. तर ओमकार भावे हा आयएनएस शिवाजी या केंद्रिय संस्थेत क्लर्क या हुद्द्यावर काम करत होता. कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी येत असल्याने कदम व भावे यांची ओळख झाली.
या ओळखीतूनच भावे याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वर्षा यांच्याकडे अठरा लाख रुपयांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून एवढी रक्कम मिळणार नाही, हे लक्षात आल्याने भावे याने आठ लाख रुपयांत नोकरी लावण्याचे आश्वासन देत वेळोवेळी पैसे उकळले होते. पैसे देऊनही काम होत नसल्याने, वर्षा यांनी ओमकार याच्या मागे कामाचा तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळून ओमकार याने वर्षा यांना नोकरीवर हजर होण्याबाबतचे बनावट नियुक्ती पत्र, सरकारी ड्रेस व कपडेही आणून दिले होते. मात्र, वर्षा यांना संशय आल्याने त्यांनी लोणावळा पोलिसात धाव घेतली व ओमकार भावे याच्या विरोधात तक्रार दिली. तर ओमकार भावे हा सरकारी शिक्के व लेटरहेडचा वापर करून लोकांची फसवणूक करत असल्याचा संशय नौसेना पोलिसांना होता. त्यांनी लोणावळा पोलिसांना कळविले होते. आरोपी ओमकार भावे आणि रचना सुर्वे ऊर्फ पूर्वा हे दोघेही अद्याप फरार असून पोलिस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या तपास करीत आहेत.