पिंपरी : ऑनलाईन जॉब शोधत असलेल्या तरुणीला जादा नफ्याचे आमिष दाखवून तिची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 21 ते 23 एप्रिलदरम्यान देहूफाटा, दिघी येथे घडला. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबाईलधारक आणि टेलिग्राम वरील एका युजरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ऑनलाईन जॉब शोधण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी तरुणीला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत अधिक नफा होईल, अशी लिंक मिळाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून तिला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, तरुणीने तब्बल एक लाख 59 हजार रुपये गुंतवले. मात्र, तरुणीला कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम मिळाली नाही. दिघी पोलिस तपास करीत आहेत.