मंचर; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचा बनाव करून युवकाची फसवणूक करीत त्याच्या घरातील दागिने व पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असणारी विवाहित महिला आणि तिचा मुलगा तसेच एक साथीदार अशा तिघांना पारगाव पोलिसांनी मंचर येथे अटक केली. त्यांच्या इतर तीन सहकार्यांचा शोध पारगाव पोलिस घेत आहेत. लता अविनाश कोटलवार (वय 51), मनोज अविनाश कोटलवार (वय 24, दोघेही रा. सध्या इंदिरानगर, आळंदी, ता. खेड, मूळ रा. दत्तनगर, चिंतावार कॉर्नरजवळ, नांदेड) आणि यास्मीन अन्वर बेग (वय 27, रा. डी बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश खंडू बांगर (वय 29, रा. भराडी, ता. आंबेगाव) याचा विवाह करायचा असल्याने त्याचे वडील मुलगी शोधत होते. त्यांनी त्यांच्या ओळखीतील वसंत किसन थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना मुलगी पाहण्यास सांगितले होते. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी वसंत थोरात मुलाच्या घरी मागणे घेऊन आले होते. त्याच्यासोबत एक पुरुष व तीन महिला होत्या. यातील पुरुषाचे नाव गणपत हाबू वाळुंज (रा. वेताळे, ता. आंबेगाव), मुलगी शीतल रमेश खुडे (रा. पूर्णा, जि. नांदेड), मुलीची मावशी लता अविनाश कोटलवार (रा. शिरवळ, पुणे), मध्यस्थी वैशाली मोरे (रा. पुणे) अशी करून देण्यात आली.
यावेळी घरात लग्नाची बैठक सुरू असताना मुलीची मावशी असलेल्या महिलेने मुलीला आई-वडील नसून, तिचा सांभाळ मी करत आहे, ती अविवाहित आहे असे सांगितले. तर लग्न जमविणारे वसंत थोरात यांनी लग्न जमवण्याचे दीड लाख रुपये घेण्याचे कबूल केले. लग्नाला मुली मिळत नसल्याने बांगर यांच्या कुटुंबीयांनी 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे कबूल केले. सगळी बोलाचाल झाल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले गणपत वाळूंज यांनी उद्या अमावस्या असून, नंतर पौष महिना सुरू होत आहे, त्यानंतर लग्न करत नाहीत, आपण आजच लग्न करू, असे म्हणत त्याच दिवशी संध्याकाळी मुलगी शीतल व मुलगा गणेश यांचा घरातच हार घालून विवाह लावून दिला.
दरम्यान, दुसर्या दिवशी बांगर कुटुंबीयांनी ठरलेले 1 लाख 30 हजार रुपये रक्कम दिल्यानंतर मंचर येथील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे त्या दोघांचा रजिस्टर पद्धतीने विवाह करण्यात आला. लग्नानंतर दुसर्या दिवसापासून फिर्यादी गणेश याला पत्नी शीतल हिच्या वागण्याच्या, बोलण्याच्या हालचालीवरून तिचा संशय येऊ लागला. तिचा पहिला विवाह झालेला असावा व तिला मुलेही असावी, असा अंदाज त्याला आला. शीतल ही गणेशच्या मोबाईलवरून बाहेर जाऊन तिची मावशी व इतरांशी बोलत असायची.
त्यामुळे संशय वाढल्याने गणेश बांगर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डर चालू ठेवत असे. त्यावरून शीतलचे पहिले लग्न झाले असून, तिला मुले आहेत, असे समजले तसेच शीतल व तिचे साथीदार यांनी लग्नाचा बनाव केला असून, वसंत किसन थोरात, गणपत हांबु वाळुंज, लता अविनाश कोटलवार, वैशाली मोरे रक्कम 1 लाख 30 हजार रुपये घेऊन पळून गेले आहेत तर शीतल खुडे हीदेखील पळून जाण्याच्या तयारीत आहे, हे गणेश बांगर याच्या लक्षात आले असता, त्याने पारगाव पोलिस ठाण्यात जाऊन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली.
त्यानुसार पारगाव पोलिसांनी याप्रकरणी लता अविनाश कोटलवार, शीतल रमेश खुडे, वसंत किसन थोरात, गणपत हांबु वाळुंज, वैशाली मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पारगावचे सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस जवान देवानंद किर्वे, अविनाश कालेकर, चंद्रकांत गव्हाणे, श्यामल तळेकर, निशा गुळवे यांनी मंचर येथील छत्रपती संभाजी चौकाजवळ सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शीतल खुडे, लता कोटलवार आणि तिचा मुलगा मनोज अविनाश कोटलवार यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शीतल खुडे हिच्याकडे अधिक तपास केला असता तिचे खरे नाव यास्मीन अन्वर असे असल्याचे तिने सांगीतले. सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करीत आहेत.