पुणे

पुणे : चव्हाणनगरला न सोडल्यास मारून टाकण्याची धमकी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पार्सल दिलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला रस्त्यात गाठून जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसून 'मी या एरियातील भाई' असल्याचे सांगत कोयत्याचा धाक दाखवून 'चव्हाणनगरला सोड नाही तर तुला मारून टाकेल,' अशी धमकी देत लुटणार्‍या स्वयंघोषित भाईला सहकानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हर्षद राजेंद्र देशमुख (नगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत यश नथु कदम (रा. आंबेगाव पठार) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 ऑगस्टच्या रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा झोमॅटो या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. पुणे-सातारा रोडवरील बालाजीनगर येथील चव्हाणनगरच्या हॉटेल सागर लॉजमध्ये तो पार्सल देण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो त्याच्या दुचाकीवरून जात असताना अचानक हर्षद देशमुख त्याच्या मागच्या सिटवर बसला. त्याने कमरेला उजव्या बाजूला लपवून ठेवलेला कोयता बाहेर काढला.

त्याने 'माझे नाव हर्ष देशमुख असून, मी येथील भाई आहे', अशी ओळख करून दिली. त्यानंतर त्याने यशला 'तू जर मला चव्हाणनगर येथे नेऊन सोडले नाही तर तुला मारून टाकेल' अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवून सागर लॉज येथून आरोपीने यशचा मोबाईल चोरी करून नेला. तसेच त्याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहाकारनगर पोलिस करत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT