कडूस: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भिमाशंकर अभयारण्य परिसरात मे महिन्यापासून पडत असलेल्या पावसाने ८.५४ टिएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ७९.१३ टक्के म्हणजेच एकूण ६.९२ टिएमसी भरले.
धरणात उपयुक्त ५.९६ टिएमसी पाणी असून पाणलोट क्षेत्रांत पावसाचा जोर कायम असल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहित धरून सोमवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता धरणाच्या अतिवाहीनीद्वारे (Escape) भिमा नदी पात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने ४०० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. (Latest Pune News)
चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार बँटिंग सुरूच असून पाणलोट क्षेत्रांत मागिल २४ तासांत २३ मिलिमीटर तर एकूण ३९८ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पाणलोट क्षेत्रातील ओढे-नाले दोन महिन्यापासून प्रवाहित झाले असून दुथडी भरून वहात आहे. भिमा व आरळा नदीद्वारे धरणात सरासरी ४००० क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या साखळीत संततधार वाढल्यास धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे भिमा नदी काठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागिल वर्षी याच तारखेला धरणात १०.७१ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता म्हणजेच मागिल वर्षीच्या तुलनेने या वर्षी धरणात ७० टक्के इतका जादा पाणी साठा झाला असून धरण लवकरच पुर्ण क्षमतेने भरणार असल्याने खेडसह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
सद्या चासकमान धरणाची पाणी पातळी ६४६. ८५ दशलक्ष घनमिटर आहे, तर एकूण साठा १९५.८९ दशलक्ष घनमिटर आहे. उपयुक्त साठा १६८.७० दशलक्ष घनमिटर आहे. मागिल वर्षी याच तारखेला धरणात १०.७१ टक्के पाणी साठा होता तर पाणी पातळी ६३२.५८ दशलक्ष घनमिटर होती, तर एकूण साठा ५०.१८ दशलक्ष घनमिटर आणि उपयुक्त साठा २२.९९ दशलक्ष घनमिटर होत.
कळमोडी धरण भरल्याचा परिणाम
चासकमान धरणाच्या वरिल बाजूला असणारे कळमोडी धरण दि. २४ जून रोजी शंभर टक्के भरले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत एकूण ६२१ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली असून या धरणातील संपूर्ण पाणी आरळा नदीद्वारे चासकमान धरणात येत असल्याने चासकमान धरणाचा पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली.