पुणे

चासकमानच्या पोटचारी अतिक्रमणांच्या विळख्यात!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला अनेक पोटचारी काढण्यात आल्या आहेत. परंतु, या पोटचारी सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत. अनेक ठिकाणी पोटचारी बुजवून इमारती बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी अनधिकृत प्लॉटिंगसाठी पोटचारी बुजविण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक शेतक-यांच्या शेतात, इमारत, घरांच्या परिसरात कालव्याचे पाणी साठल्याने दलदल निर्माण झाली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चासकमान धरणाचा डावा कालवा 144 किलोमीटर अंतराचा आहे. कालव्यातून शेतीला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने अनेक ठिकाणी पोटचारी काढल्या आहेत. यासाठी पाटबंधारे विभागाने भूसंपादन करून त्याचा मोबदला संबंधितांना दिला आहे. परंतु, वाढत्या शहरीकरणामुळे खेड तालुक्यातील सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक ठिकाणी पोटचारी भराव टाकून बुजविण्यात आली आहे.

काही ठिकाणी त्यावर इमारीती बांधल्या आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृत प्लॉटिंग देखील झाले आहे. पोटचारींचे अस्तित्वच नष्ट झाल्याने अनेक शेतक-यांच्या शेतात पोटचा-यांचे पाणी साठत आहे. त्यामुळे शेतात दलदल निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पोटचारी कचरा कुंड्या बनल्या आहेत. पोटचारीलगत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या परिसरात कालव्याचे पाणी साठून रहात आहे, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाटबंधारे विभागाचीच मिलीभगत-
चासकमान पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय सातकरस्थळ परिसरात असूनही कर्मचारी यांनी अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक ठिकाणी पोटचारीसाठी संपादित केलेल्या सरकारी जागेची देखील विक्री करण्यात आली आहे. अनेक प्रकरणात पाटेबंधारे विभागाची एनओसी घेऊन अतिक्रमणे करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ—ष्टाचार झाल्याची चर्चा आहे.

खेड तालुक्यातील सातकरस्थळ परिसरात अनेक ठिकाणी पोटचारीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे पोटचारीच नष्ट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून अतिक्रमण करणा-यांना नोटिसा देऊन कारवाई केली जाईल.

                     – ध. सै. डिग्गीकर, उपविभागीय अधिकारी
                                चासकमान प्रकल्प, खेड

SCROLL FOR NEXT