पुणे

यवत ग्रामीण रुग्णालयात सावळागोंधळ : डॉक्टर कोण हेच कळेना

Laxman Dhenge

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : यवत ग्रामीण रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात; मात्र कोण डॉक्टर उपचार करतोय, ते नावदेखील कळत नाही. रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर फोन बंद करून बसतात आणि काही तर फोन घेतच नाहीत. अशा पद्धतीने यवत रुग्णालयात सावळागोंधळ सुरू असून यावर अंकुश लावण्याची मागणी ऐरणीवर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यवत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. त्याचा लाभ परिसरातील वाड्या-वस्त्यावरील गोरगरीब नागरिकांना मिळतो. आरोग्य ही महत्त्वाची सेवा असल्याने डॉक्टरांची उपलब्धता असणे गरजेचे आहे.

सध्या या रुग्णालयात किती डॉक्टर आहेत याचा माहिती फलक नाही, कोण सेवेत आहे आणि कोण रजेवर आहे, हेदेखील कळत नाही. काही नवीन आलेले डॉक्टर ओळखीचे नसल्याने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात गैरसमजुतीमुळे शाब्दिक चकमक होत आहे. रात्रीच्या वेळी नक्की कोण सेवा देणार, याचा शोध घेताना रुग्णाचा मोठा गोंधळ होतो. या सर्वांचा प्रमुख कोण हेच समजत नसल्याने तक्रार कोणाची आणि कोणाकडे करायची हा मोठा प्रश्न रुग्णांपुढे आहे. दरम्यान सध्या येथे नव्याने एक डॉक्टर रुजू झाल्याचे कळते. त्यांचा फोन नंबर 9921661611 हा असून ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे नक्की हे डॉक्टर कुठे असतात हेच समजत नाही. शासनाच्या पगारावर काम करणारी येथील सर्वच यंत्रणा येणार्‍या रुग्णांवर उपकार करीत आहे, असेच वर्तन करताना दिसते.

या सर्व प्रकाराला आळा घालणारी यंत्रणा नक्की कुठे आहे हे समजणे देखील अवघड आहे. या रुग्णालयाच्या आवारामध्ये येथील डॉक्टरांचे नाव, मोबाईल नंबर तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता फलकावर लावावा, अशी मागणी त्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT