पुणे; पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी सकाळी (दि.19) सकाळी सातनंतर मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. गर्दी कमी होईपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणार्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्यावरून लालमहाल चौकात येणार्या वाहनचालकांनी दारुवाला पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक, बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक सोन्या मारुती चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर संत कबीर चौकातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणार्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका टॉकीज चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे तसेच बाजीराव रस्त्याने फुटका बुरूज चौकाकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात येईल. या भागातील वाहतूक केळकर रस्त्याने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून बालगंधर्व चौकाकडे जावे.