पुणे; पुढारी वृत्तसेवा : बदल तलवारी, बंदुकीतून नाही; तर साहित्यातून होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जाणारे साहित्य बदल घडवू शकेल. ज्ञानाला ज्ञानानेच उत्तर द्यावे लागेल. दडपशाहीला वैराने नव्हे, तर नव्या समाजाची स्वप्ने पाहणार्या साहित्य, कविता आणि संगीताने उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शनिवारी (दि. 10) केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांच्या हस्ते कष्टकर्यांच्या पुतळ्याच्या हाती लेखणी देऊन करण्यात आले, त्या प्रसंगी डॉ. पाटणकर बोलत होते. चळवळीचे डॉ. जालिंदर घिगे, नितीन पवार या वेळी उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, 'कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून बहुजन समाजातील मुलांना ज्ञान घेण्यापासून वंचित ठेवले जात आहे. आम्ही भिक्षा मागितली नाही. पण, एक-एक रुपयाची वर्गणी गोळा करून शाळा सुरू केली. आताही एक एक रुपया गोळा करून ज्ञानाच्या क्षेत्रात तुमचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विद्रोह हा केवळ शत्रूंच्या विरोधात नव्हे, तर शोषित जनतेमधील विचार पुढे नेण्यासाठी करावा.'
भारद्वाज म्हणाले, 'ज्ञान भाषेमध्ये नाही, तर बुद्धीमध्ये असते. भाषेमध्ये ज्ञान असते, तर चांगली शुद्ध भाषा बोलणारे शोषण करू शकले नसते. भाषा प्रेमाची असली पाहिजे. विवेक जागवणारे हरकारे हेच विद्रोही असतात. संस्कृती ही नाटक, गीत, संगीत अशा कृतीतून अभिव्यक्त होत असते. आज एक भाषा प्रेमाची, तर एक भाषा शोषणाची आहे. लक्षात ठेवा आपण नेमके कोणती भाषा बोलतो. जो शासनाच्या, असत्याच्या विरोधात बुद्धी किंवा म्हणणे मांडतो तो साहित्यकार असतो. बाकी सत्तेचा जयजयकार करणारे लोक खूप आहेत.
सत्ताधार्यांना आरसा दाखविणे कलाकाराचे कर्तव्य आहे.' अखिल भारतीय मराठी साहित्य ससंमेलनाला सरकारी निधी दिला जातो. एक जात असलेले अध्यक्ष, उद्घाटक, त्यांच्या संस्कृतीवर चालणारी चर्चा सरकारच्या जिवावर होते. सर्व पातळीवरचे मूल्य शून्य ठरविले जात आहे. बहुजनांचे प्रश्न, संस्कृती मांडली जात नाही, अशा शब्दांत घिंगे यांनी टीकास्त्र सोडले.
आपली सगळी ऊर्जा त्या संविधानाला अमलात आणायला लावली पाहिजे. 70 वर्षे झाली, कुठे आहे संविधान? आपण जातो, मतदान करतो आणि कोणताही एक नेता निवडून येतो. तो मालमत्ता घेऊन आमचा मालक बनतो. ही आपली लोकशाही नाही, तर झुंडशाही आहे. संविधानाचा पाया आम्ही तोडू देणार नाही, हा संकल्प केला पाहिजे.
– मंजुल भारद्वाज, रंगकर्मी