पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी आयटी पार्क परिसरात छोट्या वाहनांसह मोठ्या अवजड वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड वाहतूक विभागाने हिंजवडी परिसरातील वाहतुकीत बदल केले आहेत. पोलिस उपआयुक्त काकासाहेब डोळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
मारुंजी वाय जंक्शन, भूमकर चौक, काळा खडक येथून हिंजवडी आयटी पार्क मध्ये जाणार्या वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच काळा खडक येथील चौकात अवजड वाहने वळण घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. याबाबत पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात बदल केले होते. त्यावर वाहतूक पोलिसांनी अंतिम शिक्कामोर्तब करत सोमवारी (दि. 7) परिसरातील वाहतूक वळविण्याबाबत अंतिम आदेश दिले आहेत.
कोकणे चौक ते पार्क स्ट्रीट सोसायटीदरम्यान सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी या परिसरात नो पार्किंग झोन तयार केला आहे. सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीत कोकणे चौक ते पार्क स्ट्रीट सोसायटी ते कोकणे चौकदरम्यान रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. कोकणे चौक ते रघुनाथ गोडांबे चौकदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला दररोज दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात.
पिंपळे सौदागर येथे शिवसाई लेन व गोविंद यशदा चौकदरम्यान व्यावसायिक दुकाने व दाट लोकवस्ती आहे. दुकानांमध्ये खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याने ग्राहक त्यांची वाहने रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते. तसेच, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केल्याने वाहनांना यू टर्न घेण्यासही अडचण होते. या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर भागातील शिवसाई लेन व गोविंद यशदा चौकाजवळील 7 स्टार दरम्यान पी-1, पी-2 अशी पार्किंगची सम-विषम सुविधा करण्यात आली आहे. शिवसाई लेन व गोविंद यशदा चौकाजवळील 7 स्टार दरम्यान एका बाजूला सम तारखेला तर दुसर्या बाजूला विषम तारखेला वाहने पार्क करता येणार आहे.