पुणे

पिंपरी : ‘पंतप्रधान आवास’च्या गृहप्रकल्प प्रयोजनात बदल

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी व पिंपरीतील उद्यमनगर येथील दोन गृहप्रकल्प बांधून तयार आहेत. मात्र, आरक्षणात बाधित झालेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रयोजनात बदल करून आता तो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे मागेच प्रस्ताव पाठविला असून, मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. मंजुरी मिळाल्यानंतर नागरिकांना सदनिकांचे वाटप केले जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान आवास'च्या सदनिका धूळ खात; आकुर्डी, उद्यमनगर गृहप्रकल्पास मिळेना प्रतिसाद; महापालिका प्रशासनाचा वेळकाढूपणा'असे ठळक वृत्त पुढारी'ने 6 फेब्रुवारी 2023 ला प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालिकेने तातडीने पावले उचलली. राज्य सरकारकडे गृहप्रकल्पांचे प्रयोजन बदलासाठी पाठविलेल्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला. हे दोन्ही गृहप्रकल्प तयार होऊन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी, तेथील सदनिकांचे वितरण केले जात नसल्याने शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

धूळखात पडलेल्या या इमारतीची रया गेल्यास पालिकेस पुन्हा कोट्यवधीचा खर्च करावा लागू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. या संदर्भात विचारले असता आयुक्त बोलत होते. आयुक्त सिंह म्हणाले की, आकुर्डी व उद्यमनगर येथील दोन्ही गृहप्रकल्प हे पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. आकुर्डीत 568 आणि उद्यमनगरात 370 अशा एकूण 938 सदनिका आहेत.

दोन्ही गृहप्रकल्पांचे काम अद्याप 100 टक्के पूर्ण झालेले नाही. आकुर्डी प्रकल्पात सध्या विद्युतविषयक कामे सुरू आहेत. हा प्रकल्प रस्ते व आरक्षणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांना येथील गृहप्रकल्पातील सदनिका देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, त्याला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे या गृहप्रकल्पाचे प्रयोजन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून, मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मंजूरी मिळाल्यानंतर त्या गृहप्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येतील. अर्जाची सोडत काढून सदनिकांचे वितरण केले जाईल.

एकूण 938 सदनिका :
आकुर्डीत 12 माजली 6 इमारती आहेत. तेथे एकूण 568 सदनिका आहेत. तर, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमय समोवरील उद्यमनगर येथे 12 मजली 2 इमारती आहेत. त्यात एकूण 370 सदनिका आहेत. वाटपाअभावी एकूण 938 सदनिका धूळखात पडल्या आहेत.

सदनिका मिळाली नाही, मात्र बँकेचे हप्ते सुरू
बोर्‍हाडेवाडी व चर्‍होली येथील गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांनी बँक कर्ज प्रकरण करून आपला हिस्सा महापालिकेकडे जमा केला आहे. एक वर्ष झाले तरी, अद्याप सदनिका ताब्यात मिळालेली नाही. मात्र, बँकेकडून कर्जाचे हप्ते कापले जात आहेत. कर्जाचे हप्ते, सध्या राहत असलेल्या भाड्याच्या घराचे भाडे व इतर खर्च या मेळ घालण्यात लाभार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यात आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदनिकांचा ताबा द्यावा, अशी मागणी त्रस्त लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

भाजप-राष्ट्रवादीत प्रत्यारोप
शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घरे मिळावीत म्हणून आकुर्डी व उद्यमनगर येथील गृहप्रकल्पांचे प्रयोजन बदलण्यात आले आहे. त्यामुळे 938 कुटुंबांना घरी मिळणार आहे, त्यासाठी भाजपने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, चुकीचे प्रयोजन करून गृहप्रकल्पाचे बांधकाम होऊन वर्ष झाले तरी, सदनिकांचे वितरण करण्यात आले नाही. हे सत्ताधारी भाजपचे अपयश असून, त्याचे नियोजन चुकीचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. भाजप व पालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गृहप्रकल्प पडून आहे, अशी टीकाही केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT