पुणे: विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहायक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेतल्या जाणार्या सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार मे महिन्यात 4 तारखेला होणारी परीक्षा आता जून महिन्यात 15 तारखेला होणार आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात सेट परीक्षेच्या नियोजनासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार सेट परीक्षा 4 मे 2025 रोजी आयोजित केली जाणार होती. परंतु, विद्यापीठाने संबंधित परिपत्रक रद्द केले असून, आता सेट परीक्षा 15 जून रोजी घेण्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना आणखी एक महिना अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे. विद्यापीठाच्या सेट विभागाने आत्तापर्यंत 39 सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने ओएमआर शीटद्वारे घेतल्या आहेत. चाळिसावी सेट परीक्षासुद्धा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.