पुणे : पुढारी वृत्तसेवा पुणे मेट्रो आणि पुणे महापालिका संयुक्तपणे महात्मा फुले मंडई आणि परिसराचा कायापालट करणार आहे. प्रशासनाकडून नुकतेच त्याचे संकल्पचित्र जाहीर करण्यात आले. मंडई येथे मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर मेट्रो आणि पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मंडई परिसराचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याकरिता मेट्रो आणि महानगरपालिका यांनी आराखडा बनवला आहे. त्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारावर महानगरपालिकेतर्फे आयुक्त विक्रम कुमार आणि मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी स्वाक्षरी केली. मंडई परिसर विकासासाठी ११.६८ कोटी खर्च येणार आहे. पुणे मेट्रो आणि महानगरपालिका हे दोघे मिळून हा खर्च करणार आहेत. या कामामुळे मंडई परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन भूमिगत पादचारी मार्गांमुळे पादचाऱ्यांसाठी विनाअडथळा या परिसरात फिरणे शक्य होणार आहे. मंडई परिसरात एक टेरेस ओपन एअर थिएटर बांधण्यात येणार आहे. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्यक सोयींची पूर्तता करण्यात येईल. मंडईच्या मुख्य वास्तूच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी स्पेशल बॅरिअर फ्री पेडेस्ट्रीयन झोन बनविण्यात येईल. या भागात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना मज्जाव असेल.
66 हेरिटेज टूरमुळे पर्यटकांना या परिसराची इत्थंभूत माहिती व अनुभव घेता येईल. ओपन एअर थिएटरमुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करणे शक्य होणार आहे. मेट्रो स्थानकामुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर मंडई आणि परिसराशी जोडले जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापारउदीम वाढण्यास मदत होईल. महामेट्रो केवळ मेट्रो स्थानकांच्या विकासाव्यतिरिक्त स्थानकांभोवतीच्या परिसराचादेखील विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे महानगरपालिका यांच्या मदतीमुळे मंडई परिसर विकासाचा आराखडा करण्यात आला आहे. प्रस्तावित आराखड्यामुळे या परिसराचे रूप पालटणार आहे. संपूर्ण महात्मा फुले मंडई पादचारी स्नेही करण्यात येणार आहे.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
कसबा पेठ, शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठ या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वास्तू आहेत. लाल महाल, शनिवारवाडा, नाना वाडा, विश्रामबाग वाडा, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती, त्रिशुंड गणपती, तुळशीबाग या सर्व ठिकाणांना जोडण्यासाठी आणि एक हेरिटेज वॉकद्वारे तयार करण्यात येणार आहे.
मंडई मेट्रो स्थानक आणि बुधवार पेठ मेट्रोस्थानक यामुळे या परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे. त्याअनुषंगाने बसथांबे, ई-रिक्षा, सायकल, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी पार्किंग यांचा सर्वसमावेशक विचार करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करणे.
पादचाऱ्यांसाठी पादचारी मार्ग आणि भूमिगत पादचारी मार्ग यांचे योग्य नियोजन करून या परिसरात हेरिटेज वॉक टूरसाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे. या परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू, तांबट आळी, बुरुड आळी, धार्मिक स्थळे, म. फुले मंडई आणि तुळशीबाग अशी सर्व ठिकाणे सहज पायी चालत जाण्याजोगी आहेत. त्यामुळे येथे सेल्फ गाईडेड ऑडिओ दूर सुरू करणार आहे.
मेट्रो कामांमुळे विस्थापित झालेल्या दुकानांचे मंडईच्या बाजूला नवीन भवन बांधून पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. हे नवीन भवन जुन्या मंडईच्या भवनाला अनुरूप असे असेल. नवीन भवनाचे बाह्यरूप हे मंडईच्या हेरिटेज वास्तूला साम्य असणारे बनविण्यात येणार आहे.