Warkari Pudhari
पुणे

Changavateshwar Maharaj Palkhi Sohala: हरिनामाच्या गजरात संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखीचे सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारीतील मानाच्या दहा पालख्यांपैकी एक सोहळा; हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने सासवड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली

पुढारी वृत्तसेवा

सासवड:

वटेश्वर वृत्तांत सांगितला सकळा|

पूर्वी होतो आम्ही याची स्थळी ||

येथोनिया वाट जातसे पाताळा |

उघडली शिळा समाधीची ||

आसन मनोहर मृगलांछन |

पहती सुरवर आनंदाने ||

सोपान वटेश्वर करती एकांत |

कळला मनोरथ म्हणे नामा ||

या संत नामदेव महाराजांच्या अभंगाच्या ओव्यांनी आणि ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल-रखुमाई यांच्या अखंड नामघोषाने रविवारी (दि. १२) सासवड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ-मृदुंग आणि वीणा धारण केलेल्या हजारो वारकऱ्यांच्या सहभागात श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याने येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून दुपारी दोन वाजता आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले.

आषाढी वारीतील प्रमुख दहा मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एक असलेल्या या पालखी सोहळ्याने सासवडमध्ये भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीच्या मागोमाग चांगावटेश्वर महाराजांची पालखी हरिनामाच्या गजरात मार्गस्थ होताच संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला.

रविवारी पहाटे चार वाजता काकड आरती, पूजा आणि समाधीस्थळावरील धार्मिक विधींनी सोहळ्याची सुरुवात झाली. ह.भ.प. जनार्दन (आप्पा) वाबळे यांच्या हस्ते समाधीवरील पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर सत्यवान पांचाळ यांनी अभिषेक केला. वीणापूजनानंतर सभापती राजन जगताप यांच्या हस्ते आरती झाली.

अभंगगायन, पादुकापूजन आणि आरतीनंतर पालखी मंदिरातून प्रस्थान झाले. पालखी जेजुरी नाका येथे पोहोचताच नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी श्रींच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर पालखीने पुढील प्रवास सुरू केला.

या वेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश थोरात, कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, बांधकाम उपअभियंता प्रकाश निगडे, आरोग्य अधिकारी विक्रम काळे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, भाजप सासवड शहराध्यक्ष आनंद भैया जगताप उपस्थित होते.

पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. जनार्दन (आप्पा) वाबळे यांनी सांगितले की, संत योगीराज चांगावटेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा आषाढी वारीतील अत्यंत मानाचा सोहळा आहे. यामध्ये ३५ दिंड्यांचा सहभाग आहे. रथासाठी ह.भ.प. छबन महादेव कुदळे यांच्या ''सर्जा'' आणि ''राजा'' या बैलजोडीची सेवा असून, नगारखान्यासाठी ह.भ.प. सर्जेराव आबा दोरगे यांच्या बैलजोडीचा मान आहे. ज्ञानदेव कृषाजी काटे यांचा मानाचा अश्वही या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरतो.

चोपदार ह.भ.प. शशिकांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवडनंतर ही पालखी कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव मेमाणे, डाळिंब, बोरीएंदी, खामगाव फाटा, यवत, वरवंड, पाटस, कुरकुंभ, रावणगाव, रांधवणवस्ती, खडकी, काळभोरवस्ती, भिगवण, तक्रारवाडी, पळसदेव, लोणी देवकर, इंदापूर, वडापुरी, सराटी, अकलूज, बोंडले, भंडीशेगाव, वाखरी, चांगावटेश्वर मठ यामार्गे पंढरपूरला जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT