पुणे

चंद्रयान 3 यशाचा वालचंदनगर कंपनीत आनंदोत्सव

अमृता चौगुले

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : इस्रोची चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याने वालचंदनगर (ता. इंदापूर) कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगारवर्गाने मोठा जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. वालचंदनगर कंपनीने चंद्रयान 3 मोहिमेमध्ये यानाच्या उड्डाणासाठी लागणार्‍या बुस्टर मोटर्सपैकी 4 बुस्टर मोटर्सची (एस 200) निर्मिती केली होती. त्यामुळे देशाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशामध्ये वालचंदनगर कंपनीचा वाटा आहे. कंपनीने हेड एन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक आदी उपकरणे या मोहिमेसाठी बनवली आहेत.

जगाचे लक्ष लागून राहिलेली चंद्रयान मोहीम बुधवारी (दि. 23) सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी अखेर फत्ते झाली. विक्रम लॅण्डरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले. त्यामुळे वालचंदनगर कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घेतलेल्या मेहनतीला यश आले. त्यामुळे कंपनीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी व कंपनीचे युनिट हेड धीरज केसकर यांनी कंपनीत सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे अभिनंदन केले.

इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेनंतर आता गगनयान मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे. या मोहिमेसाठीची उपकरणे बनविण्याचे काम वालचंदनगर कंपनीत वेगाने सुरू आहे. येणार्‍या काळामध्ये गगनयान मोहीमही यशस्वी होईल.
                      – चिराग दोशी, व्यवस्थापकीय संचालक, वालचंदनगर कंपनी

SCROLL FOR NEXT