पुणे: राज्यातील निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल. तसे झाल्यास तातडीने निवडणूक घेण्याची आमची तयारी आहे. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागणी केलेल्या सर्व कागदपत्रे वकिलामार्फत सादर करण्यात आली आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित असून एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे रविवारी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व कार्यशाळेनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले की आमची तयारी असून तातडीने निवडणुका घेऊ असेही त्यांनी या वेळी सांगितले.
बावनकुळे म्हणाले, विधानसभेत महायुतीने 237 जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीच विजयी होईल. हे सरकार योजना बंद करणारे नसून नवनव्या योजना मांडणारे सरकार आहे.
आम्ही प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्थशीर्ष तयार करून त्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे. त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही, असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राज्यात भाजप हा दीड कोटी सदस्य व तीन लाख सक्रिय सदस्य असलेला पक्ष बनवायचा आहे. आतापर्यंत एक कोटी 16 लाख सदस्य नोंदणी झाली आहे. उर्वरित लक्ष्य आम्ही 28 फेब्रुवारीअखेर साध्य करू, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी धनंजय मुंडेंबाबत अधिक भाष्य करणे टाळले.