Pune Political News: विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने नियमानुसार विधानसभेचा विरोधी पक्षनेता होणार नाही. मात्र, याबाबत विधानसभेचे अध्यक्ष जो निर्णय घ्यायचा तो घेतील. विरोधी पक्षनेते नसेल तर मजा नाही, असे मत कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पुण्यातील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आ. पाटील यांनी विविध प्रश्नांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, इव्हीएमबाबत न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट शब्दात फटकारले आहे. जेव्हा तुम्ही विजयी होता, तेव्हा काही बोलत नाही. जेव्हा हारता तेव्हा बोलता, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने आमचे काम सोपे केले आहे. स्टोर्यांना महत्त्व नसते, त्याला पुरावे द्यावे लागतात, असेही पाटील म्हणाले.
आमचे संसदीय बोर्ड आहे. त्यात प्रत्येक विषय ठरतो, आमच्या उमेदवारांची यादीसुद्धा तिथेच ठरते. त्यामुळे कोणाला मंत्री देणार, कोणती मंत्रिपदे देणार, कोणाला पुन्हा देणार की घरी पाठवणार, याबाबत मी काही सांगू शकत नाही. नेत्यांची इच्छा ही आज्ञा असते. ज्यांच्या नशिबात जे असते, ते मिळत असते. संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात, त्यातून निर्णय होत असतात. त्यासाठी श्रेष्ठींना भेटण्याची गरज नाही. त्यामुळे मी आपल्याला काय मिळणार याचा विचार करत नाही. मुख्यमंत्री, मंत्री याबाबत मी निरुत्तर आहे.
मी पुण्याचा पालकमंत्री होण्याबाबत कार्यकर्ते मागणी करत असले तरी निर्णय श्रेष्ठी करणार आहेत. कार्यकर्त्यांची भावना असते, माणसाला प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळेल, असे वाटत असते. ते मिळेलच असे नसते, मिळेपर्यंत वाट पाहायची असते. प्रदेशाध्यक्षांची मुदत संपल्याने आता पक्षांतर्गत निवडींची प्रक्रिया सुरू होईल, असेही पाटील म्हणाले.
अलीकडच्या काही वर्षांपासून भाजपश्रेष्ठींकडून नवीन पिढीला न्याय देण्याचे काम केले जात आहे. नव्या पिढीला पुढे आणणे आमच्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे राज्यस्थान व मध्य प्रदेशासारखे प्रयोग महाराष्ट्रात होईल की नाही, हे मी काही सांगू शकत नाही. महिला आमदार व महिला मंत्री यांना आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. संतुलन राखण्यासाठी आमचे श्रेष्ठी नेहमीच प्रयत्न करत असतात, असेही पाटील म्हणाले.