पुण्यातील गुंडगिरीचा पोलिसांनी बिमोड करावा; चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची आयुक्तांशी चर्चा Pudhari File Photo
पुणे

Pune News: पुण्यातील गुंडगिरीचा पोलिसांनी बिमोड करावा; चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची आयुक्तांशी चर्चा

भाजप गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : 'गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना यातून पुण्यात वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. काही जण गुन्हेगारी घटनांशी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार करत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित आरोप करून कृपा करून शहराचे नाव बदनाम करू नका. भाजप गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही', असे मत राज्याचे तंत्र आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

'चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून कोणी पोलिसांवर दबाब टाकत असतील, तर त्यांची गय करू नका. कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करावा', असे आदेश पाटील यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पोलिस आयुक्तालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 'कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील, तसेच जैन बोर्डिंग प्रकरणात आमचे नाव जोडून काही जण त्याचा राजकीय फायदा उचलत आहेत. कोणतेही पुरावे नसताना थेट आरोप करणे चुकीचे आहे,' असे पाटील यांनी म्हटले.

पाटील म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष गुन्हेगारी किंवा गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही. एका विचारधारेतून पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करतात. मात्र, कोथरूड गोळीबार प्रकरण, घायवळ परदेशात पसार होणे, त्याला मिळालेला पासपोर्ट अशा घटनांसाठी आमचा संबंध जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणतेही पुरावे नसताना काही जण आरोप करत आहेत. जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव जोडण्यात आले. पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासावर चर्चा न करता केवळ आरोप करून बदनामीचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारांमुळे पुण्याचे नाव बदनाम होत आहे. अशा प्रकारांमुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे.'

पार्थ पवार प्रकरणावर भाष्य टाळले

पार्थ पवार यांच्या अमोडिया होल्डिंग्ज कंपनीकडून करण्यात आलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपावर पत्रकारांनी पाटील आणि मोहोळ यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला. शहरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांशी चर्चा केली, असे त्यांनी सांगून पाटील यांनी पार्थ पवार प्रकरणावर भाष्य करणे टाळले.

जातीय तणावावर पोलिसांनी लक्ष ठेवावे

'कोथरूडमध्ये दोन गटांत नुकताच वाद झाला. या प्रकरणात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील जातीय तणावांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे, असे प्रकार योग्य नाहीत', असे पाटील यांनी नमूद केले.

गुंडांची बेनामी संपत्ती जप्त करा

'गुंड टोळ्यांना आर्थिक रसद कशी पुरविली जाते. त्यांना कशा प्रकारे पैसे मिळतात. गुंडांनी केलेले बेकायदा गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालय (ईडी), प्राप्तीकर विभागाकडून चाैकशी करण्यात यावी. त्यांच्या बेनामी मालमत्ता जप्त करण्यात याव्यात, याबाबत पोलिसांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना कराव्यात', असे आदेश पाटील यांनी दिले आहेत. 'शहरातील बांधकाम व्यावसायिकांसोबत पोलिसांनी बैठक आयोजित करावी, तसेच गुंड टोळ्यांच्या म्हाेरक्यांचे त्रास, खंडणी अशा प्रकरणांबाबत बांधकाम व्यावसायिकांना योग्य त्या सूचना द्याव्यात', असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT