कडूस; पुढारी वृत्तसेवा : पुणे- नाशिक हायवेवर असणारा चांडोली फाटा (ता. खेड) दिवसेंदिवस अॅक्सिडेंट पॉइंट बनत चालला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या फाट्यावर सिग्नल बसवण्याची मागणी केली जात आहे. पुणे- नाशिक हायवेवर असणार्या राजगुरुनगर- चांडोली रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. फाट्यावर सिग्नल व्यवस्था नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. फाट्यावर दिवसभर वाहनांच्या रांगा राहत असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे.
हायवेवर सुसाट वाहने ये-जा करत असल्याने फाट्यावरून हायवेवर येणार्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा अपघात घडत आहेत. तसेच चांडोली फाट्यावरून कडूस, साबुर्डी, दोंदे, वडगाव, वाशेरे, औदर, वाजवणे, देओशी, कोहिंडे बुद्रुक आदींसह ग्रामीण भागात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. परिणामी या रस्त्यावर नागरिकांबरोबरच शेतकर्यांचीही मोठी वर्दळ असते. तसेच राजगुरुनगर शहराचीही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सर्वच प्रशासकिय कार्यालये असल्याने त्यानिमित्त शहरात येणार्या वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. अशातच नविन पुलावरून भीमाशंकरला जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर नागरिक करत असतात.
परिणामी या रस्त्यावरील वर्दळ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चालू असते. फाट्यावर मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे चांडोली फाट्यावर सिग्नल बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. संध्याकाळी कामावरून नागरिक सुटल्यावर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. हायवेवरील वाहनांची वर्दळ कमी होइपर्यंत या नागरिकांना बराच वेळ रस्त्यावर ताटकळत राहावे लागत आहे. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र नेहमीच दिसून येते.
वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची होते कसरत
सिग्नल व्यवस्था नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी नागरिक आडवी-तिडवी वाहने घालत असतात. परिणामी पोलिसांनाही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा वादांनाही सामोरे जावे लागत असते.