Pudhari Impact Pudhari
पुणे

Pudhari Impact: चांदणी चौक ते पौड महामार्ग होणार चौपदरी; खासदार सुप्रिया सुळेंचा मंत्री गडकरींना फोन

दै.‘पुढारी’च्या बातमीनंतर सुळे अ‍ॅक्शन मोडवर

पुढारी वृत्तसेवा

पिरंगुट: चांदणी चौक ते पौड हा कोलाड महामार्ग चारपदरी करून त्याला दुतर्फा सेवा रस्ता करण्याची मागणी भूगाव, भुकूम, पिरंगुटच्या नागरिकांनी केली होती. यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी या मागणीवर चर्चा केली असून, याबाबत पत्रव्यवहारही केला आहे.

शनिवारी (दि. 7) खा. सुप्रिया सुळे मुळशी तालुक्यातील विकासकामांच्या पाहणीसाठी आल्या होत्या. पौड येथे झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी हा विषय लावून धरला होता. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता चौपदरी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. (Latest Pune News)

पूर्वी 60 मीटर रुंदीचा राज्य महामार्ग असलेला हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग 753 एफ झाला आहे. कोलाड आणि कोकणात जाणारी वाहतूक तसेच लांब पल्ल्याच्या एसटी बसगाड्यांची वर्दळ या मार्गावर वाढली आहे.

पुण्याहून कोकणात जाण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग असल्याने पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मुळशी तालुक्यातील निसर्गरम्य परिसर, धरण, लवासा आणि कोळवण खोरे येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात; मात्र, भुगाव, भुकूम, पिरंगुट, घोटवडे फाटा, पौड येथे होणारी वाहतूक कोंडी स्थानिकांसह पर्यटकांनाही त्रासदायक ठरत आहे.

दै. ‘पुढारी’ने या सर्व महत्त्वाच्या बाबी प्रसिद्ध केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत गडकरींची भेट घेतली आणि या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून तो चौपदरी करण्यात येईल, असा विश्वास मुळशीकरांना दिला. या कामासाठी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे आणि मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे यांना पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन

हा रस्ता पूर्ण 60 मीटरचा होणार असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. ज्या नागरिकांनी या महामार्गावर अतिक्रमण केले आहे, त्यांनी ती स्वतःहून काढून घ्यावीत. जे नागरिक अतिक्रमण काढणार नाहीत, त्यांची अतिक्रमणे पीएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ आणि पोलिस प्रशासन मिळून काढणार असल्याचे या वेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT