पुणे

Pune Political Clash : चाकण अप्पर तहसीलवरून खेडमध्ये राजकीय ठिणगी; मोहिते-पाटील विरुद्ध बाबाजी काळे आमने-सामने!

‘पद गेल्याने मोहिते-पाटील वैफल्यग्रस्त’, ‘दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणाऱ्याला घरी पाठवणार’ : विकासकामांच्या निधीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर : कार्यालयीन कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि महसूलशी संबंधित नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, या उद्देशाने राज्य शासनाने चाकण येथे 'अप्पर तहसील कार्यालय' स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वी याची अधिकृत अधिसूचनाही प्रसिद्ध झाली. मात्र, चाकणऐवजी कडुस येथे अप्पर तहसील कार्यालय करावे, असे पत्र शिवसेना (उबाठा) आमदार बाबाजी काळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले असल्याचा दावा करत, त्यांनी चाकणच्या कार्यालयाला विरोध केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे.

या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून आमदार बाबाजी काळे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. "आम्ही चाकण येथील अप्पर तहसील कार्यालयाला कोणताही विरोध केलेला नाही. उलट, या कार्यालयाला मंजुरी मिळावी यासाठी विधिमंडळात आम्हीच मागणी लावून धरली होती," असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, तालुक्याच्या दुर्गम भागासाठी केंद्रस्थानी असलेल्या कडूस येथे 'आणखी एक' अतिरिक्त अप्पर तहसील कार्यालय व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या क्षेत्रफळाच्या तालुक्यांमध्ये मुख्य कार्यालयाव्यतिरिक्त दोन अप्पर तहसील कार्यालये असू शकतात, असेही काळे यांनी म्हटले आहे.

आजी-माजी आमदारांमधील या वादाने खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २२) चाकण येथील एका रस्त्याच्या कामावरून पुन्हा 'श्रेयवाद' पाहायला मिळाला. या रस्त्याचे उद्घाटन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, याच कामाचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते झाले होते, तर त्यापूर्वी माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या पत्नी व नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्तेही पार पडले होते. एकाच कामाचे तीनवेळा भूमिपूजन झाल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. या कार्यक्रमांदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेचा पाऊस पाडला असून, आता सोशल मीडियावर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांची बाजू मांडण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

सत्ता आणि पद गेल्यामुळे मोहिते पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम उरलेले नाही, त्यामुळे अशा केविलवाण्या कुरघोड्या सुरू आहेत. मी विरोधी पक्षाचा आमदार असतानाही विकासकामे खेचून आणत आहे. या रस्त्यासाठी निधी मिळवताना मी आमदार म्हणून पूर्ण प्रयत्न केले आहेत. जनतेने मला ५२ हजार मतांच्या फरकाने निवडून दिले आहे, त्यामुळे घरी कोण गेले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या त्यांचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' सुरू आहेत.
— बाबाजी काळे (आमदार, खेड-आळंदी, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अजितदादांच्या माध्यमातून मी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मिळवला. चाकणच्या नगराध्यक्षांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन झाले होते, नागरिकांची सोय व्हावी म्हणून आम्ही त्याला संमती दिली. मात्र, काही दिवसांपूर्वी 'ठाकरे गटाचे' आमदार येथे आले आणि त्यांनी पुन्हा भूमिपूजन उरकले. दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या अशा आमदाराला घरी पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
— दिलीप मोहिते पाटील (माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT