अविनाश दुधवडे
चाकण : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग यांची ओळख सततच्या होणार्या अपघातांमुळे आता मृत्यूचा सापळा अशी होऊ लागली आहे. त्यातच भर म्हणून चाकण-आंबेठाण रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर या रस्त्यावरील प्राणघातक आणि गंभीर अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. जीव मुठीत धरून या भागातून ये-जा करावी लागत असल्याची बाब समोर आली आहे. चाकण परीसरातील हे हायवे नागरिकांसाठी डायवे ठरू लागले आहेत.
चाकण-आंबेठाण रस्त्यावर मंगळवारी (दि. 6) सकाळी विद्यालयात निघालेल्या 19 वर्षीय तरुणीला कामगार वाहतुकीच्या खासगी बसने ठोकरल्याने ही तरुणी अत्यंत गंभीर जखमी झाली आहे. चाकणमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत चाकणमधील औद्योगिकीकरण वाढल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. या भागात आजवर शेकडो अपघात झाले असून, त्यामध्ये अनेक निरपराध नागरिकांना, रस्ता ओलांडणार्या पादचारी मंडळींना आणि दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर –
नाशिक-फाटा ते मोशी, चाकण आणि चांडोलीपर्यंत आणि तळेगाव ते चाकण-शिक्रापूर यादरम्यान, त्याचप्रमाणे चाकण-आंबेठाण रस्त्यावर लोकवस्तीच्या भागातील अनेक अपघाती ठिकाणे निर्माण झाली आहेत. प्रत्येक महिन्याला सरासरी 20 गंभीर, प्राणघातक अपघात या भागात होत असून, किरकोळ अपघातांबाबत बोलूच नये, अशी स्थिती आहे. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे आणि वेगमर्यादेचे उल्लंघन, यामुळे अपघात वाढत आहेत. भीषण अपघात एकाच वेळी अनेकांचे प्राण घेत असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे.