CET Pudhari
पुणे

CET Objection PCB Law 2026: सीईटी सेलचा विद्यार्थ्यांना इशारा; पीसीबी व लॉ CET उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याची संधी सुरू

2026-27 प्रवेश परीक्षेसाठी प्रश्न-उत्तरांवर हरकती नोंदविण्याचे आवाहन; ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पीसीबी सीईटीच्या दुसऱ्या संधीच्या तसेच पाच वर्षे विधी अभ्यासक्रम या दोन्ही सीईटीतील प्रश्नावर आणि उत्तरावर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पीसीबीसाठी 23 ते 25 मे आणि विधी पाच वर्षे सीईटीसाठी 24 ते 26 मेदरम्यान आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे नुकतीच पीसीबी समूहासाठीची दुसरी सीईटी घेण्यात आली. दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी 1 लाख 16 हजार 540 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी 95 हजार 634 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेला 82.06 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, तर तब्बल 20 हजार 906 विद्यार्थी अनुपस्थित राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाच वर्षे विधी सीईटीसाठी 37 हजार 140 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा एका दिवसात दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रात 18 हजार 596 विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 92 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

सकाळच्या सत्रात परीक्षेला एकूण 3 हजार 504 विद्यार्थी अनुपस्थित होते, तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात 18 हजार 544 विद्यार्थ्यांपैकी 14 हजार 196 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या सत्रात 4 हजार 348 विद्यार्थी अनुपस्थित होते.

ट्रॅकिंग पर्यायाची सुविधा

जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्नावर किंवा उत्तरावर आक्षेप असेल, तर ट्रॅकिंग पर्यायाद्वारे विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकतात. विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनद्वारे आक्षेप सादर करता येईल. विद्यार्थ्याला प्रतिप्रश्न / प्रतिआक्षेपासाठी लागणारी रक्कम ऑनलाईन लॉगिनद्वारे भरावी लागेल. ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले प्रश्न आणि उत्तरासंबंधीचे निवेदन विचारात घेतले जाणार नाहीत, तरी विद्यार्थ्यांनी संबंधित कालावधीत सीईटी प्रवेश परीक्षेतील प्रश्नावर आणि उत्तरावर काही आक्षेप असतील, तर ते या ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे नोंदवावेत, असे आवाहन सीईटी कक्षांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT