पुणे : पुढारी वृत्तसेवा : तब्बल एक हजार कोटी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी शुद्धिकरणाच्या कामाच्या गतीवर केंद्राने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाच्या कामाचा वेग आणि निधी खर्ची पडण्याचे प्रमाण कमी आहे, या शब्दांत केंद्राच्या वित्त आयोगाने महापालिकेला सुनावले असून, कामाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शहरात तयार होणार्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करून त्या माध्यमातून मुळा-मुठा नद्या स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने नदी सुधारणा योजना हाती घेतली. या योजनेसाठी केंद्राने जपानच्या जायका कंपनीच्या माध्यमातून महापालिकेला 841 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.
मात्र, अनुदान 2015 ला मंजूर झाले होते. त्यानंतर या योजनेसाठी सल्लागार नेमण्यापासून थेट योजनेचे काम सुरू होण्यास मार्च 2022 उजाडले होते. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च थेट 990. 26 कोटी रुपयांवरून 1 हजार 473 कोटी रुपयांवर पोहचला. दरम्यान, आता काम सुरू झाल्यानंतर अद्यापही योजनेला अपेक्षित गती मिळाली नाही. केंद्राच्या वित्त आयोगाचे अतिरिक्त सचिव वामलुंगमान वुलनाम यांनी नुकताच दिल्ली येथे या योजनेचा आढावा घेतला. त्यात 'एसटीपी'चा अंतिम आराखडा, त्याचा नकाशा अशी कामे 100 टक्के पूर्ण झाली असली तरी दीड वर्षात केवळ 15 टक्केच काम झाले आहे. यामध्ये विविध प्रकारचे बांधकाम व जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा समावेश आहे. त्या माध्यमातून 215.14 कोटी रुपयांची कामे झाली आहेत, तर 165 कोटी रुपयांची बिलं अदा झाली आहेत.
केंद्राकडून मिळालेल्या 170 कोटींचे अनुदान पूर्णपणे खर्च झाले असल्याची माहिती या बैठकीत महापालिकेकडून देण्यात आली. त्यावर केंद्राच्या अधिकार्यांनी या प्रकल्पाचे काम आणखी वेगात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रकल्पाची सिमेंट काँक्रीटची 30 टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित 70 कामांमध्ये यंत्रसामग्री बसविणे, सांडपाणी वाहिनी टाकणे अशा कामांचा समावेश आहे. येत्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जवळपास 200 कोटींची कामे पूर्ण होतील, असे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
बॉटेनिकल गार्डनची जागा मिळेना
औंध रस्ता परिसरातील बॉटेनिकल गार्डनची 33 हेक्टर जागा 'जैवविविधतेचा वारसा क्षेत्र' म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. या ठिकाणी महापालिकेला 'एसटीपी'साठी एक एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, ही जागा वारसा क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने ही जागा मिळत नाही. त्यामुळे येथील सांडपाणी प्रकल्पाचे काम रखडले आहे.
हेही वाचा :