पुणे: मुंबईतील दहीहंडी उत्सवात बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती असतेच...पण, आता हा ट्रेंड पुण्यातही रुजू लागला आहे...मराठी - हिंदी चित्रपटातील बड्या सेलिब्रिटींची पुण्यातल्या उत्सवात उपस्थित राहणार आहेत. सेलिब्रिटींची उपस्थिती अन् उत्सवाला गर्दी असा फंडा सध्या आजमावला जात असून, यंदाच्या दहीहंडी उत्सवातही सेलिब्रिटींची उपस्थिती प्रमुख आकर्षण असणार आहे.
या वर्षी तरुणाईची गर्दी होण्यासाठी राजकीय पक्षांसह दहीहंडी उत्सव आयोजित करणार्या मंडळे, संस्थांकडून सेलिब्रिटींची एंट्री हा फंडा आजमावला जाणार असून, उत्सवात येण्यासाठी सेलिब्रिटी एक ते दोन तासांसाठी 4 ते 20 लाख रुपयांपर्यंत मानधन घेणार आहेत. विशेष म्हणजे इव्हेंट कंपन्यांकडे दहीहंडी उत्सवाच्या नियोजनाचे काम देण्यात आले आहे आणि सेलिब्रिटींची उत्सवाला उपस्थितीपासून ते उत्सवाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी कंपन्यांकडे आहे. (Latest Pune News)
गोपालकाला शनिवारी (दि. 16) साजरा होणार असून, पुण्यातील यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थिती राहणार्यांमध्ये सई ताम्हणकर, ऊर्मिला कोठारे, स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, निक्की तांबोळी...अशा विविध कलाकारांची नावे पुढे येत आहेत. पुण्यात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव होणार आहेत...काही उत्सव राजकीय पक्षांनी आयोजित केले आहेत तर काही विविध संस्थांनी...पण, या उत्सवातील यंदाचा महत्त्वाचा भाग म्हणजे सेलिब्रिटींची उपस्थिती.
तरुणाईची गर्दी व्हावी, म्हणून सेलिब्रिटींच्या उपस्थितीचा फंडा या वर्षीही पाहायला मिळणार आहे. काही सेलिब्रिटींनी कार्यक्रमांना येण्यासाठी होकार कळवला असून, उत्सवाला उपस्थिती राहून तरुणाईशी संवाद साधत, गाण्यांवर ठेका धरत कलाकार उत्सवाचा एक भाग बनणार आहेत.
याविषयी माहिती देताना इव्हेंट अॅण्ड एंटरटेन्मेंट मनेजमेंट असोसिएशनचे सदस्य (इमा) निखिल कटारिया म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून उत्सवात सेलिब्रिटींची उपस्थिती हा ट्रेंड रुजत आहे. यंदाही विविध भागांमधील उत्सवांमध्ये सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी असे कलाकार उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील अनेक इव्हेंट कंपन्यांकडे उत्सवाच्या नियोजनाचे काम देण्यात आलेले आहे. त्यामुळे मंडळांच्या, संस्थांच्या आणि राजकीय पक्षांच्या उत्सवाचे व्यवस्थापन इव्हेंट कंपन्या पाहत आहेत. गोविंदांचे दहीहंडी फोडण्याचे आकर्षण तर असतेच. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हा फंडा आजमावला जात आहेत.
प्रायोजकत्व सेलिब्रिटींमुळेच
सेलिब्रिटींची उपस्थिती अन् त्यामुळे प्रायोजकत्व... असा ट्रेंड सध्या सुरू आहे. प्रायोजकत्व मिळावे, यासाठी काहींकडून सेलिब्रिटींच्या उपस्थितीचा फंडा वापरला जात आहे.