पुणे

शिरूरच्या स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही डेटा सुरक्षितच : डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही संपूर्णत: कार्यरत असून, त्यातील सर्व डेटा सुरक्षित आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होइल, अशी चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमच्या सीसीटीव्ही डिस्प्लेच्या अनुषंगाने माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने डॉ. दिवसे यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मतदानानंतर स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम आणताना त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात. त्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये सीलबंद केल्या जात असतानाही उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या प्रत्येक सीलींग प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. स्ट्राँग रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आलेली असते.

त्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे होत असलेले चित्रीकरण पाहण्याची व्यवस्था एका वेगळ्या खोलीत डिस्प्लेवर केलेली असते. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम साठवणूक केलेल्या स्ट्राँगरुमला आतील भागात केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, दुसर्‍या भागात राज्य राखीव पोलिस बल आणि तिसर्‍या भागात राज्य पोलिस दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येते. तसेच याठिकाणी वॉच टॉवर व त्याअनुषंगिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. या संपूर्ण भागाचे चित्रीकरण केले जाते ते उमेदवारांच्या प्रतिनिधींना पाहण्याची व्यवस्था करण्यात येते.

शिरूर लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करून रांजणगाव येथील गोदामात साठवणूक करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेने नोंदविलेला सर्व डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवून नये, असेही आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

स्ट्राँग रूमची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

रांजणगाव येथील शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूमला जिल्हाधिकारी डॉ. दिवसे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी शुक्रवारी स्वत: भेट देऊन पाहणी केली. येथील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती घेऊन सुरक्षेच्या द़ृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.

सीसीटीव्ही यंत्रणा आधीपासूनच कार्यान्वित आहे. ईव्हीएम यंत्रे स्ट्राँग रूमला ठेवून सीलबंद करत असताना उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र त्यानंतर ते थांबले नव्हते. दुसर्‍या दिवसापासून उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, परंतु, सीसीटीव्ही यंत्रणा पहिल्यापासून कार्यरत असून सर्व डेटा सुरक्षित आहे.

– अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी, शिरूर लोकसभा मतदारसंघ.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT