घोरपडी परिसरातील सीसीटीव्ही नादुरुस्त; नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी Pudhari File photo
पुणे

CCTV Cameras: पुणे रेल्वे स्थानकावर तीक्ष्ण होणार तिसर्‍या डोळ्याची नजर; 160 नवीन अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक कॅमेरे बसविण्याचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

Pune Railway Station Security

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील तिसर्‍या डोळ्याची नजर आता अधिक तीक्ष्ण होणार आहे. प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर 160 नवीन अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. यामुळे रेल्वे स्थानकाची सुरक्षा आता चारही बाजूंनी मजबूत होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर यापूर्वी 75 सीसीटीव्ही कॅमेरे होते. मात्र, ते जुने झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली होती. त्यामुळे आता त्या जागी स्टँडर्डायझेशन अँड क्वालिटी सर्टिफिकेशन (एसटीक्युसी) पद्धतीचे 160 नवे कॅमेरे बसविले जात आहेत. त्यामुळे स्थानकावरील कॅमेर्‍यांची संख्या आता दुप्पट होणार असून, प्रत्येक कोपर्‍यावर बारीक नजर ठेवणे शक्य होणार आहे. (Latest Pune News)

कॅमेरे अस्पष्टतेमुळे जीआरपी, आरपीएफची कसरत

पूर्वीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या अस्पष्टतेमुळे अनेकदा गुन्हेगारांचा शोध घेताना लोहमार्ग पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांना अनेकदा अडचणी येत होत्या. यापूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेत पुणे रेल्वे स्थानकावरून एका लहान मुलाचे अपहरण झाले होते.

तेव्हा जुन्या कॅमेर्‍यांमुळे अपहरणकर्त्यांचे चेहरे किंवा त्यांनी पलायन करण्यासाठी वापरलेल्या रिक्षाचा क्रमांक स्पष्ट दिसला नव्हता. यामुळे लोहमार्ग पोलिसांना तपास करताना मोठी कसरत करावी लागली होती. मात्र, आता बसविण्यात येणारे हे नवे कॅमेरे उच्च दर्जाचे असल्यामुळे अशा घटनांमध्ये गुन्हेगारांना तातडीने ओळखणे आणि शोधणे सोपे होणार आहे.

या नवीन सीसीटीव्हीमुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येईल. यावरून प्रवाशांच्या सुरक्षेला रेल्वेकडून सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. हे नवीन कॅमेरे त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, यासोबतच रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावर रात्रीची गस्तही चोख ठेवावी.
- आनंद सप्तर्षी, सदस्य, प्रादेशिक सल्लागार समिती, मध्य रेल्वे
पुणे रेल्वे स्थानकावर 160 नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत, त्याचे काम सुरू झाले आहे. हे कॅमेरे एसटीक्यूसी पद्धतीचे असणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरील यापूर्वीचे 75 जुने सीसीटीव्ही बदलून त्या जागी हे नवे कॅमेरे बसविले जात आहेत. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर आता पूर्वीपेक्षा दुप्पट सीसीटीव्ही असणार आहेत आणि त्यामुळे येथे तिसर्‍या डोळ्याची नजर चारही बाजूंनी असणार आहे.
- हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी तथा विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT