CBSE Class 10th Board Exam Pudhari
पुणे

CBSE Class 10 Two Exam System: सीबीएसईची दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; दुसऱ्यासाठी अनुपस्थितांना संधी नाही

दोन-परीक्षा प्रणालीत स्पष्टता; तीन विषयांहून अधिक गैरहजर विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने वर्षातून दोनदा दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, यातील पहिली परीक्षा आता सक्तीची केली आहे. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा देता येणार नाही, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

दोन-परीक्षा प्रणाली सुरू झाल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिली बोर्ड परीक्षा द्यावीच लागेल. जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत किमान तीन विषय देणार नाहीत, त्यांना ‌‘एसेंशियल रिपीट‌’ श्रेणीत ठेवले जाईल आणि त्यांना पुढील शैक्षणिक वर्षातच मुख्य परीक्षा द्यावी लागेल.

पहिली परीक्षा चुकवणारे विद्यार्थी थेट दुसऱ्या परीक्षेला बसू शकतात का, अशी विचारणा पालक आणि शाळांकडून सीबीएसईकडे आल्यानंतर हे स्पष्टीकरण बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा द्यावी लागेल. जे उत्तीर्ण होतील त्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची परवानगी दिली जाईल. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा यांसारख्या विषयांसाठी गुण सुधारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. परंतु जे विद्यार्थी पहिल्या

परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांना गैरहजर राहतील, ते दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र नसतील. अशा उमेदवारांना ‌‘एसेंशियल रिपीट‌’ श्रेणीत ठेवले जाईल आणि त्यांना पुढील वर्षी फेबुवारीमध्ये होणाऱ्या मुख्य बोर्ड परीक्षेला पुन्हा बसावे लागेल.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत कंपार्टमेंट मिळेल, त्यांना कंपार्टमेंट श्रेणीअंतर्गत दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे. दरम्यान, सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा 17 फेबुवारीपासून सुरू झाल्या आहेत.

नियमात सवलत मिळणार नाही

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषयांना परवानगी दिली जाणार नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वेगळे विषय घेता येणार नाहीत. जर एखादा विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव मुख्य परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांना गैरहजर राहिला तर तो सध्याच्या धोरणानुसार दुसऱ्या बोर्ड परीक्षेला बसू शकत नाही. सीबीएसईने हेही स्पष्ट केले आहे की, या नियमात सवलत देण्याच्या विनंत्यांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची पहिली परीक्षा देणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT