पुणे : पुढारी वृत्तसेवा : पदव्युत्तर शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्यासाठी हेलपाटे मारतोय. कार्यालयातील कर्मचार्यांकडून 'पुन्हा या' असे सांगण्यात येत आहे. परिणामी, शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती वाटू लागली आहे, अशी भीती येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयात प्रमाणपत्र येण्यास उशीर झाल्यानंतर चौकशीसाठी आलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली.
शैक्षणिक कामांबरोबरच शासकीय नोकरी आणि इतर कामांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्रांची अतिशय गरज असते. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जाची प्रत आणि मूळ कागदपत्रे घेऊन ती येरवडा येथील कार्यालयात तपासणीसाठी न्यावी लागतात. संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी कार्यालयातील कर्मचा-यांच्या वतीने केल्यानंतर ती पुढील कार्यवाहीसाठी सबमिट केली जातात.
मात्र, या कार्यालयात महिनोन महिने जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या कागदपत्रांचा ढिगारा पडून आहे. वास्तविक, जात पडताळणी प्रमाणपत्र हे ई-मेलच्या माध्यमातून मिळत असते. मात्र, कार्यालयातील ढिगार्यामुळे ही प्रक्रिया अतिशय संथ सुरू आहे. त्यामुळेच पालक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र कधी मिळेल, यासाठी कार्यालयात हेलपाटे मारायची वेळ आली आहे.