फुले स्मारकाची भूसंपादन प्रक्रिया युद्धपातळीवर राबवा  File Photo
पुणे

फुले स्मारकाची भूसंपादन प्रक्रिया युद्धपातळीवर राबवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दादा, शासनानं दिलेले दोनशे कोटी रुपये आले. पण, महात्मा जोतिबा फुले स्मारक आणि सावित्रीबाई स्मारक जोडण्यासाठी भूसंपादन प्रक्रियाच मंदगतीनं होतेय.. कलेक्टर साहेबांकडंही आम्ही मागणी केलीय... महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर व्यथा मांडताच, ए, त्या डुडींना फोन लाव... हॅलो, डुडी... तुम्ही ते विमानतळाचं भूसंपादन जसं युद्धपातळीवर करताय ना, त्यातच फुले स्मारकही घ्या, ठीक...आपल्या आढावा बैठकीत आता मी हा प्रश्नही विचारणार...तातडीने निर्णय घेण्यात आणि आदेश देण्यात पटाईत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिला.

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज फुलेवाडा येथे आयोजित अभिवादन सोहळादरम्यान मिसळ कार्यक्रमातच मिसळ-पावचा आस्वाद घेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्मारकांच्या एकत्रितकरणासंबंधातील अडचणी मांडल्यानंतर अजित पवार यांनी याची तातडीने दखल घेतली.

महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर झाल्यानंतर त्या स्मारकापासून काही शे मीटर अंतरावर सावित्रीबाई फुले स्मारकाचीही उभारणी करण्यात आली. ही दोन्ही स्मारके एकत्र केल्यास वेगळेच औचित्य साधले जाणार असल्याने ती जोडण्याची योजना आखण्यात आली. स्मारके जोडण्यासाठी तीस मीटरचा रस्ता करताना त्यात अनेक जुन्या घरांची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे.

त्या मिळकतींना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्याबरोबर चर्चाही सुरू आहे. मात्र भूसंपादनाचा निवाडा करावा लागणार आहे, तसेच नुकसानभरपाईची रक्कमही द्यावी लागणार आहे. यासाठी राज्य शासनाने दोनशे कोटी रूपये जाहीर केले असून ते अदाही झालेले आहेत. मात्र अजून भूसंपादन प्रक्रिया खोळंबली आहे.

महापालिका भूसंपादनासाठी प्रयत्न करतच आहे. शिवाय जिल्हाधिकार्‍यांकडेही मागणी करण्यात आली असल्याचा तपशील डॉ. भोसले यांनी सांगितल्यानंतर अजित पवार यांनी तेथूनच जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण साधताना फुले स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने करण्याचा आदेश दिला.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, की महात्मा फुले जयंतीनिमित्त महापुरुषांच्या आदर्श दिशेने चालण्याचा प्रयत्न करणार आहे. समाजात जातीय सलोखा वाढतोय. कोणत्याही महापुरुषाची जयंती आली की स्मारकाचा मुद्दा पुढे येतो. फुलेवाड्याच्या आजूबाजूची जागा घेऊन या ठिकाणी चांगले स्मारक उभारायचे आहे. यासाठी लोकांनी जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याआधी त्यांचे चांगले पुनर्वसन करायचे आहे. याबाबत मी पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करणार आहे.

भुजबळसाहेब असतील की इतर कुणी, काही घटनांमुळे वेदना होतात, त्यामुळे यात राजकारण आणण्याची गरज नाही. मी भुजबळसाहेबांशी बोलणार आहे. समाजहितासाठी हे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

स्मारकाबाबत पुढील वर्षी प्रगती दिसेल : अजित पवार

महात्मा जोतिबा फुले यांच्या आदर्शाने आम्हाला पुढे यायचे आहे. पुण्यात फुले यांचे प्रेरणादायी स्मारक उभारायचे आहे. येथील जागा ताब्यात देण्याबाबत नागरिकांनी होकार दर्शविला असून, त्या जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी लवकरच काम सुरू केले जाईल. पुढील वर्षी स्मारकाच्या कामाबाबत मोठी प्रगती झालेली असेल, असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT