कार्ला आठवडे बाजार पुन्हा सुरू
कार्ला आठवडे बाजार पुन्हा सुरू 
पुणे

कार्ला आठवडे बाजार पुन्हा सुरू

अनुराधा कोरवी

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला कार्ला येथील आठवडे बाजार शुक्रवारी पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे विविध भाजी विक्रेते व ग्राहकांना बाजार सुरु झाल्याने आनंद झाला आहे.

या आठवडे बाजाराची सुरवात कार्ला सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे,सदस्य सागर जाधव सचिन हुलावळे,सनी हुलावळे, सदस्या उज्वला गायकवाड,भारती मोरे,वत्सला हुलावळे, सोनाली मोरे ग्रामसेवक सुभाष धोत्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून मावळ परिसरातील अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील आठवडे बाजारही बंद होते.

दर आठवड्याला बाजारातून भाजी-पाला तसेच जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आठवडे बाजारास पसंती देतात. त्यानुसार या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याठिकाणी येणार्‍या ग्राहकांमुळे परिसरातील अर्थकारणास चालना मिळते. अनेकांचा उदरनिर्वाह आठवडे बाजारावर अवलंबून असतो.

आठवडे बाजारात केवळ भाजी-पाला याची विक्री न होता इतरही गरजेच्या वस्तुंची विक्री करणारे छोटे व्यावसायिक या ठिकाणी आवर्जून या आठवडे बाजारास हजेरी लावतात; मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हे आठवडे बाजार बंद होते. त्यामुळे यावर अवलंबून असणारे छोटे व्यावसायिक भाजी विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने शासनाने अनेक निर्बंध हटविल्याने आता सुमारे दोन वर्षानंतर पुन्हा कार्ला येथील आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. हा बाजार सुरु झाल्यामुळे परिसरातील छोटे व्यावसायिक तसेच भाजी-पाला विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

SCROLL FOR NEXT