Current vegetable prices in Pune market today
Pune Vegetable Market
पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात उन्हामुळे नेहमीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक घटली आहे. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर आहे. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे ढोबळी मिरची, फ्लॉवर, घेवडा, मटार, भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली होती. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. (Latest Pune News)
बाजारात रविवारी (दि. 4) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 18 ते 20 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, हिमाचल प्रदेश 3 टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 50 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 550 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार पेटी, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, भुईमूग शेंग 50 ते 60 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली होती.
मेथी, कोथिंबीर, शेपू महागला: उर्वरित पालेभाज्यांचे दर स्थिर
घाऊक बाजारात मेथीच्या भावात सर्वाधिक जुडीमागे 7 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल कोथिंबीर आणि शेपूच्या भावात जुडीमागे अनुक्रमे 5 आणि 3 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार 15 ते 20 रुपये, तर मेथीच्या जुडीला 15 ते 25 रुपये मोजावे लागत आहेत. येथील बाजारात रविवारी (दि. 4) कोथिंबिरीची एक लाख जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी असून, मागील आठवड्यात सव्वा लाख जुडी आवक झाली होती. तर मेथीची आवक निम्म्याने घटली आहे. मागील आठवड्यात 60 हजार जुडी आवक असलेली मेथीची आज 30 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली.